चंद्रपूर - सामान्य नागरिकांना न्यायासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. मात्र, दृढनिश्चय असला की अखेर न्याय मिळतोच. याचीच प्रचिती चंद्रपुरात आली. उमेश भटकर यांच्या जॉन नावाच्या श्वानाचा एका अपघातात मृत्यू झाला. महत्वाचं म्हणजे हा श्वान एका कंपनीत सुरक्षेसाठी कामावर होता. त्यातून मालक उमेश भटकर ह्यांचा उदरनिर्वाह चालायचा. त्याचा मृत्यू झाल्याने भटकर यांच्यावर आर्थिक संकट कोसळले. याविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली. तब्बल 8 वर्षे 11 महिने हा खटला न्यायालयात चालला. अखेर न्यायालयाने यात महत्वाचा निर्णय देत तीन लाखांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश ( Owner Get Compensation After Dog Death ) सुनावला.
10 जानेवारी 2013 ची गोष्ट. शहरातील तुकुम निवासी उमेश भटकर आपल्या जॉन नामक श्वानाला सकाळी फिरायला निघाले होते. आयप्पा मंदिराकडील गोपाल दूध डेअरीजवळ मेसर्स रहीम ट्रॅव्हल्स मालकीच्या स्कुल बस क्र. एमएच 40 एन 3766 ने श्वानाला थेट धडक दिली. यात जॉन नामक श्वानाचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे जॉन आरती इन्फ्रा नामक कंपनीत रखवाली करण्याचे काम करत होता. यातून मालकाला दरमहा 8 हजार इतके मानधन मिळत होते. आपला लाडका आणि कमावू श्वान गेल्यामुळे भटकर यांना मोठा मानसिक आघात बसला. तसेच त्यांचे मोठे आर्थिक नुकसान देखील झाले. याबाबत त्यांनी नुकसान भरपाईची मागणी स्कुल बस मालक आणि विमा कंपनी केली आणि त्यांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
मृत श्वानाच्या न्यायासाठी 9 वर्षांचा संघर्ष; मग न्यायालयाने दिला हा निर्णय - Chandrpur news
महामार्गावर एका अपघातात श्वान ठार झाल्यानंतर मालक उमेश भटकर यांनी आपल्या श्वानाला न्याय मिळालाच हवा म्हणून न्यायालयात धाव घेतली. 8 वर्ष 11 महिने न्यायालयात लढा दिल्यानंतर बसचालक अन इन्शुरन्स कंपनीकडून त्यांनी 3 लाख रुपये भरपाई ( Owner Get Compensation After Dog Death ) मिळविली आहे.
त्यामुळे याविरोधात त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. सोबत श्वानाचे शवविच्छेदन करण्यात आले. ज्याच्या अहवालात हा मृत्यू अपघाताने स्पष्ट झाले. यानंतर भटकर यांनी मोटर अॅक्सिडेंट क्लेम्स ट्रिब्यूनल चंद्रपूरच्या न्यायालयात खटला भरला. यात भटकर यांनी विमा कंपनी बजाज अलायन्स, ट्रॅव्हल्स मालक आणि चालक सुधाकर थेरे ह्यांना गैरअर्जदार केले. यात श्वानाच्या मृत्युमुळे आर्थिक नुकसान झाले असून पाच लाखांची नुकसानभरपाई देण्यात यावी, असा दावा ठोकला होता. अॅड. जयप्रकाश पांडे यांनी भटकर ह्यांची बाजू न्यायालयात लावून धरली. तब्बल 8 वर्षे 11 महिने हा खटला चालला. अखेर जिल्हा सत्र न्यायालयाने 9 डिसेंबरला यावर महत्वाचा निर्णय देत एक लाख 62 हजार नुकसानभरपाई तसेच या रक्कमेवर दरवर्षी 8 टक्के याप्रमाणे ही नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. त्यानुसार नऊ वर्षे याप्रमाणे तीन लाख ही रक्कम होत आहे. न्यायाधीश एस. जे. अन्सारी ह्यांनी हा महत्वाचा निर्णय सुनावला आहे. चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या आजवरच्या इतिहासात हा पहिलाच आगळावेगळा निर्णय मानल्या जात आहे.