चंद्रपूर - जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीवर वाघाने हल्ला ( couple attacked by tiger in chandrapur) केला. यात पत्नीला वाघाने ठार केले. पतीला फरफटत जंगलात नेले. ही घटना चिमूर तालुक्यातील केवाडा-गोंदाडा जंगलात आज दुपारी घडली. पतीचा अद्याप शोध लागला नाही. त्याचा वनविभाग आणि गावकरी शोध घेत आहे. पत्नीचे नाव मीना जांभूळकर असे आहे.
तेंदुपत्ता आणण्यासाठी गेले होते जंगलात - सध्या तेंदुपत्ता संकलनाचा हंगाम सुरू आहे. शेतीची काम अजूनही सुरू झाली नाही. त्यामुळे गावखेड्यातील महिला, पुरुष, युवक, युवती जंगलात तेंदुपत्ता संकलनासाठी जातात. तालुक्यातील केवाडा येथील विकास जांभुळकर आणि पत्नी मीना जांभुळकर हे दोघेही सकाळच्या सुमारास केवाडा- गोंदेडा जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेले होते.
पत्नीचा आढळला मृतदेह - तेंदुपत्ता संकलित करीत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने दोघांवरही हल्ला केला. बराच वेळ लोटून जांभुळकर दाम्पत्य घरी परतले नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरचे आणि आजूबाजूच्या नागरिकांनी जंगल गाठत शोधमोहीम सुरू केली. केवाडा-गोंदेडा जंगलात पत्नी मीना जांभुळकरचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.