चंद्रपूर - परतीच्या पावसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान केले. यातून बळीराजा अद्यापही सावरलेला नाही. तर आता गुलाबी बोंडअळी या नव्या संकटाचा सामना बळीराजाला करावा लागत आहे. राजुरा आणि कोरपना तालुक्यातील कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले आहे. शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगत योग्य औषधांची फवारणी करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
बळीराजा हवालदिल : कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आता 'गुलाबी' संकट - Chandrapur news
सततच्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे कपाशी पिकातून उत्पन्न मिळेल या आशेवर शेतकरी होता. मात्र आता यावर देखील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे. शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगत योग्य औषधांची फवारणी करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात नगदी पीक म्हणून कपाशीच्या पिकाला अधिक पसंती आहे. एकूण लागवडीच्या ऐंशी टक्के क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली आहे. मागील काही वर्षात बीटी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याने उत्पन्नात वाढ झालेली आहे. उत्पन्नात झालेली वाढ व मिळणारा बाजारभाव यामुळे मागील दोन वर्षांपासून शेतकरी कपाशी लागवडीकडे वळला आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. अनेक उपाययोजना करून देखील कीड नियंत्रणात आली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा सामना करावा लागला. त्यानंतर सतत पडणाऱ्या पावसाने पिकांची नासाडी झाली. तर आता कपाशी पिकावर बोंडअळीने आक्रमण केले आहे. यासंदर्भात कृषी विभागाने देखील सर्व्हे केले आहेत. राजुरा तालुक्यातील कळमना येथील सुधाकर पिंपळशेंडे, मदन वाढई, कावदू पिंगे तसेच कोरपना येथील नितीन कोडे, भारत मोहितकर (अंतरगाव), विशाल पावडे (हिरापूर), दिलीप बंदोलकर (सोनूर्ली) यांच्या शेतातील कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले आहे. बीटी बियाणांमधील किटकनाशक विरुद्ध लढण्याची कार्यक्षमता असते. ती ११० दिवसानंतर संपत असल्याने आता कपशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. यावर उपाय योजना म्हणून पंधरा दिवसाच्या फरकाने किनॉलफॉस, थायोडीकॉर्ड, क्लोरपायरीफस, फेनव्हलरेज या औषधांची योग्य मात्रा घेऊन फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. यावर्षी राजुरा उपविभागातील राजुरा तालुक्यात 30 हजार 23, गोंडपिपरीत 17 हजार 930, कोरपना 29 हजार 180, जिवती 11 हजार 268 आणि पोंभुर्ना 5 हजार 457 हेक्टर क्षेत्रात कपाशी पिकाची लागवड केली आहे.सततच्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे कपाशी पिकातून उत्पन्न मिळेल या आशेवर शेतकरी होता. मात्र आता यावर देखील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे.