चंद्रपूर - जिल्ह्यात लागलेल्या संचारबंदीमुळे सर्वत्र चांगला परिणाम दिसत आहे. काही ठिकाणी अतिउत्साही नागरिकांकडून याची पायमल्ली होताना दिसत आहे. यामुळे पोलिसांना अनेकदा बळाचा वापर करावा लागत आहे. सोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांच्या स्पष्टतेचा अभाव पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येत आहे. यामुळेही अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे.
संचारबंदीमधून वगळण्यात आलेल्या तातडीची सेवा देणाऱ्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अतिउत्साही नागरिकांमुळे यामध्ये आणखी जास्त गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी अशा अतिउत्साही कार्यकर्त्यांना पोलीस 'प्रसादही' देत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, नागरिक याबाबत तितकेसे जागरूक नाहीत. त्यामूळेच राज्यात संपुर्ण संचारबंदी लावण्याचा निर्णय सरकारने घेतला. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनीही याबाबत निर्देश दिले आहेत. याचे पालन न करणाऱ्यांवर सक्तीची कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहे. यानंतर पोलीस यंत्रणेने सुद्धा अनेक ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे.