चंद्रपूर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपु्र्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार आणि व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. याचा प्रतिकुल परिणाम गरीब, मजुर, स्थलांतरीत कामगार, बाहेरगावचे विद्यार्थी यांच्यावर पडला आहे. या जनतेचे जेवणाचे सर्वात जास्त हाल होत आहेत. त्यामुळेच राज्यशासनाने तालुका स्तरावर शिवभोजन योजना सुरु करण्याची घोषणा केली. त्यानुसार रविवारी चिमूर येथे शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रांवर गरजूंना 5 रुपयात जेवण मिळणार आहे.
हेही वाचा...आओ दीया जलाएं! पंतप्रधान मोदींनी शेअर केली वाजपेयींची कविता
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल सेवा बंद आहे. याशिवाय कोणतीही अन्य भोजन सेवा उपलब्ध नाही. मोल-मजुरीसाठी जिल्ह्यात आलेले मजूर, झोपडपट्टीत राहणारे नागरिक यांना अशा परिस्थितीत जेवणाची सोय होत नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. अशाच कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांना घराबाहेर पडून अन्न मिळवणे जिकिरीचे होत असल्याने यांच्यासाठी मुख्यमंत्र्यानी शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढवुन ती तालुका स्तरावर चालु करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार चिमूर येथे शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले आहे, येथे गरीब आणि गरजुंना 5 रुपयात शिवभोजन थाळी मिळणार आहे.
या शिवभोजन केंद्राचे तहसीलदार संजय नागटिळक यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. शहरातील महाराष्ट्र बँकेजवळील शिक्षक कॉलनी येथे समाधान फॉऊंडेशन द्वारा हे केंद्र चालवले जाणार आहे. येथे 100 थाळ्या देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्घाटन प्रसंगी उप विभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, अन्न पुरवठा निरीक्षक अधिकारी आशीष फुलके, नगर परिषदचे मुख्याधिकारी मंगेश खवले, गट विकास अधिकारी संजय पूरी आदी उपस्थित होते.