चंद्रपूर- जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना लसीकरण केंद्रावर आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर सोनारकर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला व जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी एकूण 331 जणांना ही लस देण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गेहलोत यांची उपस्थिती होती.
पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील 16 हजार 524 कोरोना योद्धांना कोविशिल्ड लसीसाठी नोंदणी करण्यात आली असून त्यांना टप्प्याटप्प्याने लस देण्यात येणार आहे. आज चंद्रपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर व पठाणपुरा आरोग्य केंद्र तसेच वरोरा, ब्रह्मपुरी व राजुरा या सहा केंद्रांवर लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. प्रत्येक केंद्रावर 100 लाभार्थींचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले. लस कुठे द्यावी, कधी द्यावी याबाबत सुक्ष्म नियोजन करण्यात आले असून कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सर्वांच्या समन्वयाने जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावेळी सांगितले.