चंद्रपूर : वनविभाग अंतर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातील मौजा सुशी (दाबगाव) येथे 24 एप्रिलला चार महिन्याचे वाघाचे बछडे आढळले होते. या बछड्यांचा कोरोना चाचणीसाठीचा नमुना नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला होता. मात्र, प्राण्यांच्या कोरोना चाचणीला येथे मान्यता नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा नमुना आता भोपाळ येथील मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय केंद्रात पाठवण्यात येणार आहे.
चंद्रपूरातील वाघाच्या बछड्यांची कोरोना चाचणी आता भोपाळमध्ये होणार... हेही वाचा...बिहारमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस; वीज कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी अमेरीकेत वाघांना कोरोना झाल्याने जगभर खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर या बछड्याची ही चाचणी चंद्रपूर वनविभागाने केली होती. मात्र. यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 24 एप्रिलला मूल तालुक्यातील सुशी दाबगाव येथे अंदाजे 3-4 महिन्याचा वाघाचा बछडा आढळून आला. घटनेची माहिती वनविभागाला प्राप्त होताच. विभागीय वनाधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक यांच्या नेतृत्वात बछड्याला पकडून सुरक्षितरित्या पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथील ट्रांजिट ट्रिटमेंट सेंटर चंद्रपूर येथे हलवण्यात आले.
पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमुचे देखरेखीत हा बछडा आहे. सद्यस्थितीत कोरोनाची साथ सुरु असल्याकारणाने वाघाच्या बछड्याचे कोविड 19 कोरोना टेस्ट करीता स्वॅब नमुने गोळा करुन पशुवैद्यकिय महाविद्यालय, नागपूर येथे तपासणीकरीता पाठवण्यात आले होते. मात्र, यासाठीची अधिकृत परवानगी आपल्याकडे नाही. यासाठी मध्यप्रदेश येथील भोपाळ, उत्तर प्रदेशातील बरेली आणि हरियानातील हिसार येथे केंद्रे आहेत. यापैकी भोपाळ जवळ असल्याने हा नमुना नागपूर येथून भोपाळ येथे पाठवण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय वनाधिकारी ए. एल. सोनकुसरे यांनी दिली.