महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना टास्क समिती बैठक : दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने नियोजन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना - चंद्रपूर कोरोना टास्क समिती न्यूज

देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता गडद होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. आज चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत एक बैठक घेतली असून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

Corona
कोरोना

By

Published : Nov 24, 2020, 8:16 PM IST

चंद्रपूर - युरोपात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. देशातही दिल्ली व इतर काही राज्यात दुसऱ्या लाटेची भीती वाढत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात देखील दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने नियोजन करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोरोना टास्क समितीची बैठक घेतली. चंद्रपूरमधील आतापर्यंतच्या सर्वाधिक कोविड रुग्णसंख्येच्या दहा टक्के अधिक रूग्णसंख्या गृहीत धरून आरोग्य सुविधांचे नियोजन करण्याबाबत यंत्रणेला निर्देश त्यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोरोना टास्क समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे, डॉ. प्रकाश साठे उपस्थित होते.

चाचण्या वाढविण्याचे निर्देश -
यावेळी जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी ॲन्टीजेन टेस्ट, आरटीपीसीआर टेस्ट तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याबाबत मनपा तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले. सध्या सुरू असलेली कोविड रुगणालये व तेथील मनुष्यबळ कमी न करता आहे तसेच सुरू ठेवण्याबाबत व सर्व रुग्णालयात आवश्यक औषधींचा मुबलक प्रमाणात साठा करून ठेवण्याविषयी त्यांनी यंत्रणेला सांगितले. तसेच शासनातर्फे लस उपलब्ध झाल्यास त्याचा साठा करण्यासाठी आवश्यक तापमानाच्या फ्रिजरच्या उपलब्धतेबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली.

स्थानिक ऑक्सिजन सुविधा सुरू होणार -
शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसेच स्त्री रुग्णालय येथे प्रत्येकी 20 किलोलीटर लिक्विड ऑक्सिजन टँक लवकरात लवकर प्रस्थापीत करून ते सुरू करण्याविषयी अधिष्ठाता यांना सूचीत केले होते. या दोन्ही ठिकाणी लिक्वीड टँक लागले असून शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन टँक येत्या पाच सहा दिवसात पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असे अधिष्ठाता डॉ. हुमणे यांनी सांगितले.

साडेपाच हजार रुग्णांसाठीची तयारी -
जिल्ह्यात सद्यस्थितीत 1 हजार 780 ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. तर कोरोनाची दुसरी लाट थांबविण्याच्यादृष्टीने 5454 ॲक्टीव रुग्णसंख्येचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी 2 हजार 182 होम आयसोलेशनमध्ये, सौम्य लक्षणे असलेले 2 हजार 454 रुग्ण, ऑक्सिजन खाटांची आवश्यकता असणारे 654, व्हेंटीलेटरवरील 82 व आयसीयुतील 82 रुग्ण असे वर्गीकरण करण्यात आले आहे.
वरील अपेक्षित रूग्णसंख्येप्रमाणे सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी 1 हजार 977 खाटा उपलब्ध असून 477 खाटांची कमतरता भासेल, मात्र ही कमतरता लवकरच भरून काढण्यात येईल. ऑक्सिजन खाटांची मागणी 654 अपेक्षित आहे, त्या तुलनेत 823 खाटा उपलब्ध आहेत. तर व्हेंटीलेटर 82 अपेक्षित असताना 96 उपलब्ध आहेत. आयसीयु खाटांची संख्या 82 अपेक्षित असताना त्या 153 उपलब्ध आहेत. जिल्हा स्त्री रुग्णालय येथे 450 खाटांचे कोविड रूग्णालय प्रस्तावित आहे. त्यापैकी 50 ऑक्सिजन व 50 आयसीयुसह एकूण 100 खाटा स्थापित झाल्या असून उर्वरित 350 खाटांचे काम प्रगतीपथावर आहे व ते लवकरच कार्यान्वीत करण्यात येणार आहे. तसेच सैनिक शाळा येथे कोविड हेल्थ केअर सेंटर मध्ये 400 ऑक्सिजन खाटांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून ऑक्सिजन पाईपलाईन व इतर साहित्य सामुग्रीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. आवश्यकता भासल्यास या 400 खाटा देखील तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील असेही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले.

जिल्ह्यातील रुग्णालयाची स्थिती -
जिल्ह्यात शासकीय व खाजगी मिळून सध्या 7 कोविड रुग्णालये आहेत. तर 14 पैकी 12 कोविड हेल्थ केअर सेंटर व 23 पैकी 16 कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ज्या सेंटरमध्ये रुग्ण नाहीत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले नसून रुग्णसंख्या वाढल्यास तेथेही उपचार सुरू करण्यात येतील.

दिल्ली, राजस्थान, गोवा, गुजरात येणाऱ्यांची होणार चाचणी -
अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिल्ली, राजस्थान, गोवा व गुजरात येथून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची कोविड तपासणी करण्याबाबत शासनाच्या सूचना असल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या सूचनेप्रमाणे ज्या प्रवाशांकडे प्रवासाच्या 96 तास अगोदरचे आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह रिपोर्ट नसतील त्यांची रेल्वे स्थानकार तपासणी करण्यात यावी. कोरोना सदृष्य लक्षणे आढळणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी. यासाठी चंद्रपूर, वरोरा व बल्लारपूर रेल्वे स्थानकावर तपासणी पथक नेमण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. तपासणी रिपोर्ट येईपर्यंत संबंधीत प्रवाशाला कोविड केअर सेंटरमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास गृह विलगीकरणाचा पर्याय देखील खुला असेल. तसेच पॉझिटिव्ह रिपोर्ट असणाऱ्या प्रवाशांची माहिती रेल्वे प्रशासनाला देऊन कॉन्टॅक्ट ट्रेसींगद्वारे संबंधितांना सूचित करण्याचे नियोजन अंमलात आणण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यंत्रणेला दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details