चंद्रपूर - कोरोनाशी दोन हात करताना जी व्यक्ती अखेरचा श्वास घेते ती कुणाचे वडील, कुणाची आई, भाऊ, बहीण किंवा आणखी कोणी जिवलग असते. मात्र, जेव्हा त्यांना स्मशानभूमीत आणले जाते तेव्हा मात्र, तो निव्वळ एक मृतदेह असतो. कारण, एक-दोन नव्हे तर अनेक मृतदेह एकाच वेळी स्मशानभूमीत आणले जात आहेत. अशा परिस्थिती येथे भावनेला स्थान नसते. आणलेल्या मृतदेहांची त्वरित विल्हेवाट लावायची असते. कारण पुन्हा दुसऱ्या मृतादेहांची खेप येथे आणायची असते. ही स्थिती आहे चंद्रपूर शहरातील स्मशानघाटाची. कोरोनाने माणसांपासून मानवी संवेदनाच हिरावून घेतली आहे. आणि आपण यावर काहीही करू शकत नाहीत. चंद्रपूरच्या स्मशानभूमीत दररोज 15 ते 20 मृतदेहांना अग्नी दिला जात आहे. सकाळपासून सुरू झालेल्या चितेच्या ज्वाला शमतच नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती किती बिकट झाली आहे, याचे हे द्योतक आहे.
आरोग्य यंत्रणा कोलमडली, मृत्यू वाढले -
जेव्हा राज्यभरात कोरोनाचे रूग्ण चिंताजनकरित्या वाढत होते. त्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यात मात्र, ही संख्या फक्त दोन आकडी होती. मात्र, राजकीय अनास्था आणि जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वेळीच ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. रूग्णांना बेडसाठी वणवण फिरावे लागत आहे. तरीही त्यांना बेड उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड देखील मिळेनासे झाले आहेत. बेड नाही म्हणून रूग्णांना चोवीस तास वाहनात बसवून तर गंभीर रूग्णाला उघड्यावर झोपावे लागत आहे. याचा परिणाम म्हणजे मृत्यूदरात अचानक वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे दररोज दोन ते तीन मृत्यू होत होते. आता हीच संख्या सरासरी 15 ते 16 पर्यंत पोचली आहे.
भंगारमध्ये निघालेल्या शववाहिका घ्याव्या लागल्या सेवेत -