चंद्रपूरShivani Wadettiwar: राज्य सरकारने उद्योग, ऊर्जा, कामगार विभागाने 6 सप्टेंबरला शासन निर्णय काढला. यात शिक्षण व विविध विभागांत मनुष्यबळ बाह्य यंत्रणेमार्फत पुरविण्यात येणार आहे. यामुळे राज्यभर विरोधाचा सुर उमटू लागला आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या शुक्रवारी युवक, विद्यार्थ्यांच्या वतीने जनआक्रोश मोर्चा (Janaakrosh Morcha) काढण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता दीक्षाभूमीपासून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांचा जनआक्रोश मोर्चा हा कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत नसून युवकांच्या स्वयंस्फूर्तीने काढण्यात येत आहे.
शिवानी वडेट्टीवार यांची सोशल मीडियावर पोस्ट : हा मोर्चा पूर्णतः राजकारण विरहित असल्याचा दावा आयोजन समितीने केला होता. यानंतर विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर ज्या पोस्ट टाकल्या त्यामुळे हा मोर्चा काँग्रेसच्या नेतृत्वात काढण्यात येत असल्याचा संभ्रम निर्माण झाला. याबाबत जनआक्रोश मोर्चाच्या समन्वय समितीच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. वास्तविक समन्वय समितीच्या माध्यमातून मागील 15 ते 20 दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या आंदोलनासंदर्भात विद्यार्थी आणि युवकांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना या विरोधामध्ये आंदोलनात सामील होण्यासाठीचे आव्हान करण्यात येत आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून उद्या जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.