चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात यंदा 12 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. पहिल्या टप्प्यात 9 बाजार समित्यांचे मतदान 28 एप्रिलला पार पडले होते. तर मतमोजणी आज पार पडली. यात अनेक धक्कादायक निकाल पुढे समोर आले. 9 बाजार समितीच्या निकालात मूल, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, कोरपना या ठिकाणी काँग्रेसने स्पष्टपणे विजय मिळवला. चंद्रपुर, राजुरा येथे भाजप-काँग्रेसची युती होती. या दोन्ही ठिकाणी या पॅनलने विजय मिळवला. नागभीड, चिमूर येथे भाजप समर्थीत पॅनल विजयी ठरली. वरोरा बाजार समितीच्या निकालात अपक्ष उमेदवाराने आक्षेप घेतल्याने मतमोजणी पूर्ण व्हायला वेळ लागला. येथे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी उभे केलेल्या पॅनलचे 8 उमेदवार निवडून आले तर काँग्रेस, मनसे, भाजप समर्थीत पॅनलने 9 ठिकाणी विजय मिळवला. बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप, कांग्रेस पुरस्कृत पॅनल यांच्यामध्ये खरी लढत होणार असे चित्र होते, मात्र देशात कांग्रेस, भाजप वेगळ्या विचारधारेचे पक्ष असले तरी चंद्रपुर जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीत भाजप, कांग्रेसने एकत्र येत निवडणूक लढली.
चुलशीची लढत :मूल बाजार समितीच्या निवडणुकीत कांग्रेस विरुद्ध कांग्रेस असे चित्र होते, कांग्रेस खासदार बाळू धानोरकर विरुद्ध माजी पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांचे पॅनल होते. वडेट्टीवार यांच्याकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी धुरा सांभाळली. त्यांनी 18 पैकी 17 जागांवर त्यांनी विजय मिळवला. चंद्रपूर बाजार समिती निवडणुकीत भाजप, कांग्रेस ने आघाडी करीत 12 जागेवर विजय मिळवला. तर खासदार धानोरकर चोखारे गटाला 6 जागेवर समाधान मानावे लागले. राजूरा बाजार समितीत माजी आमदार, वामनराव चटप यांच्या शेतकरी संघटनेला केवळ तीन ठिकाणी विजय मिळवता आल्या. उर्वरित 15 जागांवर काँग्रेस-भाजपने विजय मिळवला. कोरपना बाजार समिती - 13 कांग्रेस, शेतकरी संघटना, गोंडवाना गणतंत्र पार्टी 5, भाजप -0, याच प्रमाणे ब्रह्मपुरी बाजार समिती - कांग्रेस 14, भाजप 4, सिंदेवाही बाजार समिती - कांग्रेस 11, भाजप 7, चिमूर - भाजप 17, कांग्रेस 1, नागभीड - भाजप 14, कांग्रेस 4 अशी आकडेवारी आहे.