चंद्रपूर -राजूरा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली आहे. राजूरा मतदारसंघात शनिवारी महत्वाची राजकीय घटना घडली. माजी आमदार सुदर्शन निमकरांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असतानाच गडचांदूर नगरपरिषदेचा नगराध्यक्ष आणि दोन नगरसेवकांनी कमळ पुष्प हातात धरले. राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी काँग्रेसचा सोबतीला तर काही स्वतंत्र भारत पक्षाचा प्रचारात गुंतले आहेत. एकंदरीत चित्र बघता राष्ट्रवादी काँग्रेसचा सरसकट एकाच पक्षाला लाभ होईल,असे चित्र नाही. दरम्यान इकडून तिकडे, तिकडून इकडे निमकर पक्षांत्तर करत असतात त्यात नवे काय, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण निमजे यांनी लगावला आहे.
ज्या गडचांदूरात नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे तिथल्या नगराध्यक्षांसह दोन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, चार सदस्य अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याचा दावा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अरुण निमजे यांनी केला आहे. माजी आमदार सूदर्शन निमकर यांचा राजकीय इतिहास बघता त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर आमदारकी मिळवली होती. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. अर्ध्या तासासाठी त्यांनी शिवबंधनही बांधले होते. ते आता भाजपत जाणार आहेत. निमकरांना विश्वासात न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका आधीच जाहीर केली होती. त्यामुळे निमकरांशी प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांच्या संख्येबाबत मतदारसंघात चिमटे काढले जात आहेत.