चंद्रपूर - नोकरीवर रुजू होण्यापूर्वी एक युवक पोलीस स्टेशनमध्ये चारित्र्य प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेला. मात्र, तिथे गेल्यावर त्याला जबर धक्का बसला. कारण त्याच्या नावावर दारू तस्करीचे दोन गुन्हे असल्याचे सांगण्यात आले. त्याच्याच नावाच्या दुसऱ्या व्यक्तीने हे गुन्हे केले होते. मात्र, नाहक मनस्ताप या युवकाला सहन करावा लागत आहे. एका पोलीस स्टेशनमधून दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये फेऱ्या मारण्याची वेळ त्याच्यावर आलीय. वेळेत चारित्र्य प्रमाणपत्र न मिळाल्यास युवकाला नोकरी देखील गमवावी लागणार आहे.
एकाच नावाचे दोन व्यक्ती... होतकरू तरुणाला पोलिसांनी ठरवलं दारू तस्कर! - chandrapur police news
नोकरीवर रुजू होण्यापूर्वी एक युवक पोलीस स्टेशनमध्ये चारित्र्य प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेला. मात्र, तिथे गेल्यावर त्याला जबर धक्का बसला. कारण त्याच्या नावावर दारू तस्करीचे दोन गुन्हे असल्याचे सांगण्यात आले.
![एकाच नावाचे दोन व्यक्ती... होतकरू तरुणाला पोलिसांनी ठरवलं दारू तस्कर! chandrapur police news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9348602-827-9348602-1603913804543.jpg)
वॉर्डातील युवकांनी विचारणा केल्यानंतर हा प्रकार समोर आला. वॉर्डातील एका युवकाच्या मदतीने त्याने पोलीस ठाणे गाठून अधिक माहिती जाणून घेतली. तेव्हा शेगाव पोलीस ठाणे हद्दीत गणेश मडावी हा दारू तस्कर असून, त्याच्याविरुद्ध दोन गुन्हे नोंदवल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यावेळी गणेशने शहर पोलिसांना आपण गुन्हेगार नसल्याचे पुरावे दिले. आपले नाव एक आहे. मात्र, व्यक्ती दोन असल्याचे पटवून दिले. तेव्हा शहर पोलिसांनी त्याला शेगाव पोलीस ठाण्यात धाडले. त्यानंतर गणेशने शेगाव गाठून तेथील पोलिसांना सर्व घटनाक्रम सांगितला. शेगाव पोलिसांनीही सर्व शहानिशा केल्यानंतर चंद्रपुरातील गणेश मडावी हा दुसरा असून, शेगाव हद्दीतील दारू तस्कर गणेश मडावी हा अन्य व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले.
मात्र, आता त्या प्रमाणपत्राची पुढील प्रक्रिया कोण करणार, यासाठी शहर पोलीस आणि शेगाव पोलीस एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. पोलिसांच्या या भूमिकेने गणेशची नोकरी अडचणीत आली आहे. कंपनीमध्ये निर्धारित कालावधीत चारित्र्य प्रमाणपत्र न दिल्यास त्याला नोकरी गमवावी लागेल.