चंद्रपूर - जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात २०१५ मध्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र विहीत मुदतीमध्ये सादर केले नाही. यामुळे तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतीतील १९३ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या अपात्र सदस्यांमध्ये सर्वाधिक अनुसूचित जमाती प्रवर्गातील सदस्यांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सार्वजनिक स्वराज्य संस्था व अन्य निवडणुकांमध्ये नाम निर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असते. हे प्रमाणपत्र त्यावेळी उपलब्ध नसल्यास निवडणूक विभागाच्या विहित मुदतीमध्ये ते जोडावे लागते. मात्र, चिमूर तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतीमधील २०७ सदस्यांनी विहित मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेच नाही. यापैकी अनुसूचित जमाती प्रवर्गातील १४ सदस्यांचे प्रकरण हे न्याय प्रविष्ठ आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी २२ नोव्हेंबरला या सर्व सदस्यांना अपात्र घोषित केल्याचे आदेश दिले. त्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे तालुका निवडणूक विभागाने १९३ सदस्यांना नोटीसा बजावल्या आहेत.
हेही वाचा - जप्त केलेल्या 39 लाखाच्या दारूसाठ्यावर पोलिसांनी चालवला बुलडोजर