चंद्रपूर -अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे भाजपमध्ये जाणार अशा प्रकारची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला होता. जोरगेवार यांनी भाजपला पाठिंबा देण्याचे अधिकृतरित्या काल जाहीर केले. त्यानंतर जोरगेवार यांच्याविरोधात संतापाची लाट उसळू नये, यासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांना समोर यावे लागले. आपल्या नेतृत्वात बनणाऱ्या सरकारला जोरगेवार यांचा पाठिंबा असून त्यांच्या मतदारसंघातील मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.
जोरगेवार यांनी आधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, काँग्रेसकडून त्यांच्याऐवजी महेश मेंढे यांचे नाव समोर आले. त्यामुळे, जोरगेवारांनी अपक्ष लढण्याची तयारी केली. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करताना ऐनवेळी त्यांना काँग्रेसचा एबी फॉर्म देण्यात आला. त्यांनी तो भरल्यानंतर तो फॉर्म अवैध ठरवण्यात आला. त्यामुळे त्यांना पुन्हा अपक्षच लढावे लागले. मागील पाच वर्षांत सातत्याने जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणाऱ्या उमेदवारावर अन्याय झाला अशी अनेकांची भावना तयार झाली. त्यामुळे जोरगेवार यांना लोकांची सहानुभूती मिळण्यास सुरुवात झाली. जोरगेवार यांनी प्रचारादरम्यान भाजपविरोधात टीकेची झोड उडविली होती. आपण कुठल्याही राजकीय पक्षात जाणार नाही असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळेच सर्व समाज, सर्व वर्गातील मतदारांनी जोरगेवार यांना भरभरून मतदान केले. 2014 मध्ये पराभूत झालेले जोरगेवार हे यावेळी तब्बल 75 हजारांच्या फरकाने निवडून आले.