चंद्रपूर - कमी दराचे कंत्राटी काम अचानक रद्द करून ज्यादा दराचे कंत्राट मंजूर करण्याचा प्रकार गटनेते पप्पू देशमुख यांनी समोर आणला. हा मुद्दा मनपाच्या आमसभेत चांगलाच गाजला. यामध्ये आयुक्त राजेश मोहिते यांची भूमिका संशयास्पद असून त्याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून करण्यात यावी, अशी मागणी देशमुख यांनी सभागृहात केली होती. यावर महापौर राखी कंचर्लावार यांनी 'तुम्ही काही जज नाहीत' असं म्हणत ती मागणी धुडकावून लावली आणि उपायुक्त यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. मात्र, 'एका वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी त्याच संस्थेतील कनिष्ठ अधिकारी कसा करू शकतो' असं म्हणत देशमुख यांनी महापौर यांचा हा निर्णय बालिशपणाचा आणि हास्यास्पद असल्याचा शेरा दिला. एकूणच भोजन पुरविण्याच्या घोटाळ्याबाबत आता महापौर कंचर्लावार आणि गटनेते देशमुख यांच्यात शाब्दीक ' वॉर' सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
मनपाच्या 'भोजन घोटाळ्या'वर महापौर आणि पप्पू देशमुख यांच्यात शाब्दिक 'वॉर' - महापौर आणि गटनेते वाद चंद्रपूर
लॉकडाऊनच्या काळात शहरातील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना भोजन, नाश्ता पुरविण्याची जबाबदारी महानगरपालिकेची होती. मात्र, याच्या दरामध्ये घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याच्यात चढ्या भावाने दर लावण्यात आले. यामुळे मनपाच्या तिजोरीतून 60 लाख अधिक द्यावे लागले. हा घोटाळा मनपाचे गटनेते पप्पू देशमुख यांनी समोर आणला.
यानंतर एकमेकांच्या वक्तव्यावर या दोन्ही नेत्यांची शाब्दिक चकमक होताना दिसून आली. 'महापौरांची चौकशी' म्हणत देशमुख यांनी यावर ताशेरे ओढले आणि या प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपविण्याची मागणी केली. यावर महापौर यांनी आपल्या वक्तव्यात 'देशमुख हे काही जज नाही. ते जेवण दिलंय का नाही याचे पुरावे मागत आहेत. देशमुख यांच्याकडून अशी थट्टा सुरू आहे, असे म्हणत देशमुख यांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. तर देशमुख यांनी या सर्व प्रकरणाचे पुरावे दिले असतानाही महापौर शाब्दिक अवहेलना करताहेत. जर या भोजन घोटाळ्यात सत्ताधाऱ्यांचा हात नसेल तर महापौर यांनी याची थेट चौकशी दुसऱ्या स्वतंत्र संस्थेला का देत नाहीत? असा सवाल केला. एकंदरीत या प्रकरणावर या दोघांत चांगलाच कलगीतुरा बघायला मिळाला. त्यामुळे पुढील काही दिवसांत या मुद्द्यावर आणखी राजकारण तापणार असं चित्र दिसून येत आहे.
माजी महापौरांकडून देशमुखांची पाठराखण
कोरोनाच्या काळात आता आमसभा ऑनलाइन घेतली जात आहे. पप्पू देशमुख यांनी भोजन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला असता, अडीच वर्षे महापौरपद भुषविणाऱ्या अंजली घोटेकर यांनी याला समर्थन दिले. जर भोजनाबाबत असा प्रकार झाला असेल तर याची चौकशी व्हावी? अशी मागणीही त्यांनी केली.
महापौरांकडून दोन प्रकरणांची 'सळमिसळ'
पूर्वी बाहेरून येणाऱ्यांना दहा दिवस 'कोरोन्टीन' केले जात होते. तर लॉकडाऊनच्या काळात कुणाची उपासमार होऊ नये त्यांना डबे पुरविले जात होते. या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत. हा घोटाळा क्वारंटाईन सेंटरबाबत असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर कंचर्लावार याचे भान उरले नाही. क्वारंटाईन प्रकरणावर बोलण्याऐवजी त्या डबेवाटपाच्या मुद्द्यावर बोलून मोकळ्या झाल्या. खरं तर गरिबांना डबेवाटपाच्या विषयावर यापूर्वीच्या अनेक आमसभेत चर्चा झाली होती.
हा शिष्ठाचार महापौरांना का जमला नाही?
या घोटाळ्याबाबत आरोप करताना पप्पू देशमुख यांनी सभागृहात थेट आयुक्तांचा उल्लेख करून त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले. यावर महापौर कंचर्लावार यांनी जोरदार आक्षेप घेत देशमुख यांची कानउघडणी केली. यानंतर देशमुख यांनी आपले शब्द परत घेतले. मात्र, देशमुख यांच्याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना सांस्कृतिक शिष्ठाचाराचे भान उरले नाही. 'तो काय न्यायाधीश आहे का? तो असा कुणाचा कसा उल्लेख करतो' अशा हमरीतुमरीच्या भाषेचा उपयोग करून त्यांनी आपला संताप व्यक्त केला. देशमुख यांनी चूक केली मात्र ती मागे घेतली मात्र, हा शिष्ठाचार महापौरांना जमला नाही.