महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 17, 2021, 3:11 PM IST

ETV Bharat / state

चिमूर तालुका कोरोनामुक्त; नागरिक आणि कोरोना योद्धांच्या प्रयत्नांना यश

देशभर कोरोना महामारीचा प्रकोप असताना कोरोना संसर्गापासुन चिमूर तालुकाही सुटला नाही. पहिल्या लाटेपासुन आतापर्यंत तालुक्यात ३ हजार ७३६ कोरोना रुग्ण आढळले. १६ जुलैला तालुक्यातील सक्रीय असणारे दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने चिमूर तालुका कोरोनामुक्त झाल्याचे दिलासादायक वृत्त आहे.

चिमूर उपजिल्हा रूग्णालय
चिमूर उपजिल्हा रूग्णालय

चिमूर (चंद्रपूर) - देशभर कोरोना महामारीचा प्रकोप असताना कोरोना संसर्गापासुन चिमूर तालुकाही सुटला नाही. पहिल्या लाटेपासुन आतापर्यंत तालुक्यात ३ हजार ७३६ कोरोना रुग्ण आढळले. १६ जुलैला तालुक्यातील सक्रीय असणारे दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने चिमूर तालुका कोरोनामुक्त झाल्याचे दिलासादायक वृत्त आहे.

संयुक्त प्रयत्नाने शक्य -

चिमूर तालुक्यात कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेच्या प्रकोपापेक्षा दुसऱ्या लाटेने मोठे थैमान माजवले होते. यात भीसी हा मोठा हॉटस्पॉट ठरला होता. ज्यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागाचा ताण वाढला. मृत्यूचेही प्रमाण वाढल्याने नागरिकांत कोरोनाची भिती तयार झाली. अनेकांना ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागला तर अनेक रुग्णांना खाट उपलब्ध होऊ शकली नव्हती. अशा बिकट परिस्थितीत शासनाने लादलेल्या कडक निर्बंधाने तसेच सामान्य नागरिकांनी काळजी घेऊन, कोरोना योद्ध्यांच्या दिवस रात्र परीश्रमाने हा संसर्ग आटोक्यात येण्यात यश प्राप्त झाले आहे.

तालुक्याची आकडेवारी -

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासुन १६ जुलैपर्यंत ११ हजार २६९ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. त्यापैकी १ हजार ८९७ चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. १५ हजार ६९० व्यक्तींची रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी १ हजार ८३९ व्यक्तींचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तालुक्यात अशाप्रकारे १६ जुलैपर्यंत एकुण ३ हजार ७३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यापैकी आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ६३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ९ जुलैपासुन १६ जुलैपर्यंत दोन्ही प्रकारच्या चाचण्यांमध्ये कोणीही पॉझिटिव्ह नव्हते. ९ जुलैला ४ कोरोना रुग्ण सक्रीय होते. त्यापैकी दोन रुग्ण ११ जुलैला कोरोनामुक्त झाले तर उरलेले दोन रुग्ण १६ जुलैला कोरोनामुक्त झाले. अशाप्रकारे चिमूर तालुका कोरोनामुक्त झाल्याची दिलासादायक माहिती उपजिल्हा रुग्णांलयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. गोपाल भगत यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details