चंद्रपूर- चिमूर पोलिसांनी शनिवारी दारू तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आणि एकाला दारू साठ्यासह अटक केली. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीसोबत फोटो सेशन केले. त्यांचे हे फोटो सेशन वादाच्या भोवऱ्यात आले आहे. कारण कोरोनामुळे फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्क लावा, असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, फोटो सेशन दरम्यान पोलिसांनी ना मास्क लावला. ना फिजिकल डिस्टन्सिंग राखले. विशेष बाब म्हणजे, यावेळी चिमूरचे ठाणेदार स्वप्निल धुळे हे देखील फोटो सेशनमध्ये उपस्थित होते.
शनिवारी संध्याकाळी चिमूर पोलिसांनी इनोव्हा गाडीतून दारूच्या 20 पेट्या जप्त केल्या आणि एका आरोपीला अटक केली. या कारवाईवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत. कारण, ज्यावेळी इनोव्हा गाडीचा टायर फुटल्याने त्यातील दारू एका दुसऱ्या वाहनात भरण्यात येत होती. त्यावेळी तिथे पोलीस आहे. पोलिसांना पाहून तस्करांनी दुसऱ्या गाडीतून पळ काढला. या वाहनाला पकडण्याची तसदी पोलिसांनी घेतली नाही. दोन आरोपी असताना केवळ एक आरोपीला अटक दाखवण्यात आली, असा आरोप प्रत्यक्षदर्शी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास डांगे यांनी केला आहे.