चंद्रपूर- लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेल्या परिस्थिती थोडी पूर्वपदावर यावी, यासाठी काही अटीशर्ती ठेऊन दुकाने, प्रतिष्ठाने व बाजारपेठा सुरू करण्याची मुभा देण्यात आली. मात्र, चिमूर येथील हार्डवेअर दुकानदार सतत या अटींचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर नगरपरिषदेने त्यांच्यावर प्रत्येकी ५ हजार रुपये दंड आकारून दोन दिवस दुकान बंद ठेवण्याची नोटीस बजावली आहे.
देशात कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्याचा कालावधी वाढतच आहे. ज्यामुळे सामान्य नागरिक, गरीब, मजूर, उद्योग, व्यवसाय प्रभावित झाले असून अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच सर्व व्यवहारांची साखळी खंडीत झाली आहे. रेड, ऑरेंज व ग्रीन झोननुसार उद्योग व्यवसाय व सामान्यांच्या जीवनाची घडी बसण्यासाठी काही अटीशर्ती ठेऊन शासनाने लॉकडाऊन शिथील केले. मात्र यामूळे अनेक नागरिक, दुकानदार हे शासनाने घातलेले नियम विसरल्याचे सर्वत्र दिसून येते.