चिमूर(चंद्रपूर) - मुंबई पोलीस दलामधे चिमूर तालुक्यातील एका टोकाला असलेल्या चिचाळा शास्त्री या ग्रामीण भागातील रुपाली अरविंद राऊत या महिला पोलीस म्हणून कार्यरत आहे. तर कुटुंब स्वगावी राहून शेती करते. तर त्यांचा पाच वर्षीय अथर्वही वडिलांसोबत गावाकडे राहतो. आई मुबंईत पोलीस आहे. फेब्रुवारी महिन्यात ती आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आली. नेहमीप्रमाणे तिचे पती व पाच वर्षांचा अथर्व तिला नागपूर रेल्वे स्टेशनला सोडण्यास गेले. रेल्वे स्टेशनवर मुलाने मम्मीला विचारले तू आता कधी येणार? तिने मुलाला सांगितले, की एप्रिल महिन्यात तुला सुट्या लागल्या की पप्पांसोबत मुंबईला ये. छोटा अथर्व हो म्हणाला. तो नेहमीच त्याच्या वडिलांसोबत मम्मीला सोडायला नागपूर रेल्वे स्थानकावर जात असल्यामुळे त्याला सवय झाली होती. मात्र, आता मम्मी तू कधी येणार, आम्ही कधी येऊ, असा टाहो छोटा अथर्व फोडत आहे.
आपल्या मम्मीला नागपूर रेल्वे स्टेशनवर सोडायला गेल्यावर मम्मीचे बोलणे त्याने लक्षात ठेवले होते. मार्च महिन्यामध्ये देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला व २३ मार्च पासून १४४ लागू करून सर्वत्र संचारबंदी लागू केली. सर्व शाळा, खासगी, सरकारी वाहतूक, विमान रेल्वे पूर्ण सेवा बंद करण्यात आल्या. सुट्ट्या लागल्यामुळे त्या चिमुकल्या अथर्वने वडिलांना प्रश्न विचारला की पप्पा मी शाळेत का जात नाही? तर त्या वडिलांनी तुला सुट्टया लागल्या आहेत, असे उत्तर दिले. लगेच अथर्वने दुसरा प्रश्न केला, की मम्मीलाही सुट्या लागल्या असतील ना, ती मुंबईला ये म्हणत होती, आपण कधी जायचे. वडिलांनी अथर्वला काही दिवसात जाऊ, असे सांगितले. मात्र, छोटा अथर्व रोज तोच प्रश्न विचारतो आहे.
आई तू कधी येणार....चिमुरच्या लहानग्या अथर्वचा टाहो... - चंद्रपूर कोरोना न्यूज
मुंबई पोलीस दलामधे चिमूर तालुक्यातील एका टोकाला असलेल्या चिचाळा शास्त्री या ग्रामीण भागातील रुपाली अरविंद राऊत या महिला पोलीस म्हणून कार्यरत आहे.
शेवटी वडिलांनी अथर्वने सांगितले, की बेटा कोरोना विषाणूच्या वाढीमुळे ते रोखण्यासाठी लाकडाऊन व संचारबंदी आहे. त्यामुळे देशातील व राज्यातील सर्व वाहतूक व गाड्या बंद आहेत. मम्मीला पोलीस असल्याने सुट्ट्या नाहीत, जेव्हा सर्व सुरू होईल तेव्हा जाऊ मुंबईला. तेव्हा पाच वर्षांच्या अथर्व म्हणाला, मुंबईला जाऊ, तिकडे नाही न कोरोना? मुलगा अथर्व थोडा समजदार असल्याने त्याने लगेच प्रश्न केला की मम्मी पण मुंबईला असते मग मम्मी ड्युटीवर कशी जाते? तेव्हा वडिलांनी संगीलते की बेटा त्यांना जावेच लागते लोकांच्या सुरक्षितेसाठी मम्मीची ड्युटी आहे. एवढे संभाषण झाल्यानंतर त्या रात्री रोजच्या प्रमाणे मम्मीचा मुलाला फोन आला वडिलांनी फोन मुलाला दिला. मुलगा रडत रडत तू घरी कधी येणार म्हणून मम्मीला विचारत आहे. कोरोना संपल्यावर लगेच तुला भेटायला येते, असे ती आई लहानग्या अथर्वला समजावती आहे. मम्मी मुंबईला कोरोना आहे. तू तोंडाला मास्क लावत जा, नेहमी हँडवॉशनी चांगले हात धूवुन घेत जा. मुलाचे ते बोलणे ऐकून त्या आईच्या डोळ्यातून पानी वाहू लागले व ती ढसा ढसा रडू लागली. हा सर्व प्रकार सुरू असताना वडील जवळच होते ते पण खूप रडू लागले.
पोलीस लोकांच्या कुटुंबात अशा प्रकारचे कितीतरी दुःख आहेत. अनेक कुटुंब एकमेकांना अनेक महिन्यांपासून भेटले नाहीत. विचार करा, आपण आपल्या कुटुंबाशिवाय एक दिवससुद्धा राहू शकत नाही. कोरोनाच्या भीतीमुळे प्रत्येक परीवार एकमेकांच्या काळजीत घरामध्येच बसला आहे. परंतु पोलीसांना आपली ड्युटी प्रामाणिकपणे आपल्या सुरक्षिततेसाठी करावी लागत आहे. चिमूर तालुक्यातील त्या पाच वर्षाच्या अथर्वचा टाहो पाहून आपण घराबाहेर न निघून प्रशासनाला सहकार्य करूया. जेणेकरून कोरोना लवकरच संपुष्टात येईल व हे कुटुंबीय लवकरच एकमेकांना भेटू शकतील. अनेक चिमुरडे त्यांच्या आई-वडिलांना भेटू शकतील.