महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष.! आशिया खंडातील बांबूची 'ही' सर्वात मोठी इमारत आहे आपल्या महाराष्ट्रात - बांबू संशोधन केंद्र चंद्रपूर

चीचपल्ली बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची इमारत केवळ बांबूपासून तयार करण्यात आलेली आशिया खंडातील सर्वात मोठी इमारत म्हणून लौकिक प्राप्त आहे. कुठल्याही पद्धतीचे काँक्रीट उपयोगात न आणता निव्वळ माती आणि बांबूपासून ही भव्य इमारत तयार करण्यात आली आहे. सिंगापूरच्या एका प्रसिद्ध मासिकाने याची दखल घेतली आहे.

Chichpalli Bamboo Research and Training Centre
चीचपल्ली बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र

By

Published : Aug 7, 2020, 4:06 PM IST

Updated : Sep 3, 2020, 6:32 PM IST

चंद्रपूर - शहरापासून काही अंतरावर असलेल्या चीचपल्ली बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची इमारत केवळ बांबूपासून तयार करण्यात आलेली आशिया खंडातील सर्वात मोठी इमारत म्हणून लौकिक प्राप्त आहे. कुठल्याही पद्धतीचे काँक्रीट उपयोगात न आणता निव्वळ माती आणि बांबूपासून ही भव्य इमारत तयार करण्यात आली आहे. सिंगापूरच्या एका प्रसिद्ध मासिकाने याची दखल घेतली आहे. या इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास आले असून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. जाणून घ्या काय आहे या इमारतीची खासियत.

चीचपल्ली बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र...

पार्श्वभूमी

चंद्रपूरसारख्या जंगलव्याप्त जिल्ह्यात बांबू सहज उपलब्ध होतो. आजवर या बांबूचा उपयोग हा पारंपरिकरित्या कडे, टोपल्या, कुंपण करणे आणि शेतीची कामे आदी करण्यासाठी व्हायचा. मात्र, त्यातून स्थानिकांना हवा तसा आर्थिक आधार मिळत नव्हता. आसाम सारख्या राज्यात बांबूपासून नाविन्यपूर्ण वस्तू तयार करण्याचे रितसर प्रशिक्षण दिले जात होते. राज्याचे तत्कालीन अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही बाब हेरली आणि चंद्रपूर येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. याला या प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील मोठी साथ लाभली. 4 डिसेंबर 2014 ला याला मान्यता देण्यात आली तर 28 मार्च 2017 ला याचे भूमिपूजन करण्यात आले.

इमारतीची संकल्पना

या केंद्रासाठी चीचपल्ली येथील जागा ठरवण्यात आली. 8.99 हेक्टर एवढा या बांबू प्रशिक्षण केंद्राच्या परिसराचे क्षेत्रफळ आहे. तर तब्बल एक लाख स्क्वेअर फूट जागेवर याचे बांधकाम होणार होते. येथे बांबू नाविन्यपूर्ण कला हस्तगत करण्यास येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांसमोर एक आदर्श असावा म्हणून ही संपूर्ण इमारत पुर्णतः बांबूपासून तयार करण्याची संकल्पना उदयास आली. आव्हान मोठे होते मात्र टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शिफ्ट नावाच्या कंपनीने याचे संपूर्ण आर्किटेक्चर तयार केले.

हेही वाचा -'नव्या शैक्षणिक धोरणाला कुणीच भेदभावजनक न ठरवणे ही आनंदाची गोष्ट'

पायाभूत सोयीसुविधा

संशोधन केंद्राच्या इमारतीचे वेगवेगळ्या १४ प्रकारात विभागणी केलेली असून त्यामध्ये प्रशासकीय इमारत, कार्यशाळा इमारत, शैक्षणिक इमारत, वसतीगृह, उपहारगृह, निवासस्थाने यांचा समावेश आहे.

इमारतीचे वैशिष्ट्य

या इमारतीत छतापासून तर पाया पर्यंत फक्त बांबू वापरलेला आहे. गरजेनुसार तो सिंधुदुर्ग आणि आसाम येथून मागविण्यात आला. उत्खनन करताना जी माती निघाली त्याचा उपयोग या इमारतीत भक्कमपणे करण्यात आला. चंद्रपूर सारख्या शहरात उन्हाळ्यात तापमान 48 अंशापर्यंत जात असते. मात्र येथील इमारतींचे बांधकाम अशा पद्धतीने केले आहे, की नैसर्गिक तापलेली हवा इमारतीतुन वर निघून जाते तर थंड हवा ही इमारतीत राहते. त्यामुळे बाहेरील तापमानापेक्षा इमारतीच्या आत गारवा असतो. तर हिवाळ्यात ही इमारत उबदार होते. म्हणून येथे कुठलेही कुलर किंवा एअर कंडिशनर लावण्यात आले नाही.

रोजगार निर्मिती

येथे बेरोजगार महिला व पुरुष, बचतगटातील महिलांना बांबू वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिल्या जाते. बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. यासोबतच येथे युवक युवतींसाठी दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम देखील आहे. 2017 ते 18 कालावधीत 14 विद्यार्थ्यांनी यात प्रवेश घेतला तर 2018-19 मध्ये 12 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. सध्या त्रिपुरा राज्यातील अगरतला येथील केंद्रात हा अभ्यासक्रम ते पूर्ण करत आहेत. मात्र, लवकरच हे शिक्षण आता चीचपल्ली येथे सुरू होणार आहे.

Last Updated : Sep 3, 2020, 6:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details