चंद्रपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम मोडणाऱ्या ६८५ लोकांवर चंद्रपूर महानगरपालिकेच्या पथकांनी कारवाई केली असून १ लाख ४५ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये मास्कशिवाय फिरणार्या नागरिकांवर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या तसेच विनापरवानगी दुकान सुरू ठेवण्याऱ्या दुकानदारांचा समावेश आहे.
महानगरपालिकेची 685 लोकांवर कारवाई; दीड लाखाचा दंड वसूल - चंद्रपूर कोरोना
कोरोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत व त्यानुसार मनपातर्फेही मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले होते.
![महानगरपालिकेची 685 लोकांवर कारवाई; दीड लाखाचा दंड वसूल चंद्रपूर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7085581-408-7085581-1588762283130.jpg)
कोरोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत व त्यानुसार मनपातर्फेही मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, तरीही शहरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे आढळून येत आहेत. याशिवाय काही दुकानदार विनापरवानगी दुकाने सुरू ठेवत असल्याचे आढळून आल्याने मनपाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याची अंमलबजावणी २३ एप्रिलपासून सुरू करण्यात आली असून मनपाच्या तीनही झोनमार्फत कारवाई करण्यात येत आहे.
कारवाईदरम्यान मास्क लावण्याची समज देण्यात येऊन प्रत्येक नागरिकाला ३ मास्क देण्यात येत असून, यादरम्यान सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष देऊन कारवाई करण्यात येत आहे. सहायक आयुक्त सचिन पाटील, शितल वाकडे, धनंजय सरनाईक यांच्या नेतृत्वात तीनही झोनचे क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, नरेंद्र बोभाटे, सुभाष ठोंबरे, अतिक्रमण विभागाचे नामदेव राऊत तसेच स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, उदय मैलारपवार, भूपेश गोठे यांच्याद्वारे कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईसाठी प्रत्येक प्रभागात पथक तैनात केली आहेत. दंड करण्याची कारवाई सातत्याने सुरू राहणार असून आपण व इतरांच्या सुरक्षिततेसाठी मास्क लावून ठेवण्याचे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.