चंद्रपूर - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून आपल्या देशातही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतही या कठीण काळातून जात आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या उपचाराकरिता अनेक उद्योगपती, सामाजिक संस्था, कलावंत, जागरूक नागरिक मदत करण्यास पुढे येत आहे. त्यात आता चंद्रपूर जिल्हा परिषदेनेही पुढाकार घेतला आहे. यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेकडून तब्बल 30 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशा प्रकारचा निधी मंजूर करणारी चंद्रपूर जिल्हा परिषद ही बहुदा राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद असावी. जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले यांनी आपल्या अधिकाराअंतर्गत हा निधी मंजूर केला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले यांची प्रतिक्रिया... हेही वाचा...पीक कर्ज भरण्याची मुदत वाढली...तरीही वयोवृद्ध शेतकऱ्यांची बँकांमध्ये तोबा गर्दी
केंद्र आणि राज्यस्तरावर कोरोनावर प्रतिबंधकात्मक अशा अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनता या विषाणूच्या प्रसारापासून दूर राहावी, त्यांना प्राथमिक सुरक्षा व उपचार प्राप्त व्हावे, यादृष्टीने जिल्हा परिषद शासनाकडून प्राप्त होणाऱ्या विविध सुचनांच्या आधारे ग्रामपंचायती व प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतगर्त गावपातळीवर विविध उपाययोजना करत आहेत. या आणीबाणीच्या प्रसंगी तातडीची उपायोजना करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला.
जिल्हा परिषद अध्यक्षा यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ अन्वये असा निधी मंजूर करण्याचा अधिकार असतो. या अधिकाराचा वापर करत तालुका स्तरावर औषध, साहित्य खरेदी करण्याकरिता जिल्हा निधीतून तीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. हा निधी जिल्ह्यातील पंधरा पंचायत समित्यांना वितरित करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेणारी चंद्रपूर जिल्हा परिषद ही राज्यातील बहुदा पहिलीच नगरपरिषद असेल.