चंद्रपूर -कोरोनाची चाचणी करून आम्हाला गावी परत जाऊ द्या... अशी आर्त साद तेलंगणामध्ये अडकलेल्या गोंडपिंपरी तालुक्यातील मजुरांनी घातली आहे. गोंडपिपरी तालुक्यात रोजगाराच्या संधी अत्यल्प आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिक रोजगारासाठी तेलंगणात धाव घेतात. सद्यस्थितीत तिथे मिरची तोडीचा हंगाम सुरू आहे. यासाठी महाराष्ट्रातून मजुरांचे लोंढे गेले होते.
'कोरोनाची चाचणी करा पण परत जाऊ द्या' - corona chandrapur
तेलंगाणाच्या खम्मम जिल्ह्यातील वांगीपल्ली येथे गोंडपिंपरी शहरातील २५ मजूर अडकले आहेत. मिर्ची तोडावयास गेलेल्या या गोंडपिंपरीस्थित पंचशील प्रभागातील २५ मजुरांची आता कोरोनाच्या दहशतीने स्वगृही परतण्यासाठी धडपड सुरू आहे.
कोरोनाच्या भीषण संकटामुळे देशभर संचार बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना बाहेर पडता येत नाही. सर्व राज्यांच्या सीमा बंद केल्यामुळे मजुरांना तेथेच अडकून पडावे लागले आहे. जवळचे अन्नधान्य संपल्याने उपासमारीची वेळ आलेल्या मजुरांपुढे स्वगृही परतण्याचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
गोंडपिपरी तालुक्यालगत तेलंगणा राज्याची सीमा आहे. यामुळे गोंडपिपरी तालुक्यातील नागरिक रोजीरोटीसाठी हाकेच्या अंतरावरील तेलंगणाची वाट धरतात. अश्याच प्रकारे तेलंगणाच्या खमंग जिल्ह्यातील वांगीपल्ली येथे गोंडपिपरी शहरातील २५ मजूर अडकले आहेत. मिर्ची तोडावयास गेलेल्या या गोंडपिपरीस्थित पंचशील प्रभागातील २५ मजुरांची आता कोरोनाच्या दहशतीने स्वगृही परतण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे.
मजुरांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडील अन्नधान्य संपलेले आहे. ज्या गावात त्यांचे वास्तव्य आहे. तेथील लोकांनी कोरोनाच्या भितीमुळे या मजुरांना गाव सोडण्याची सक्ती केली आहे. कोरोनाच्या दहशतीने शेतमालकाच्या शेतातच या मजुरांचे वास्तव्य सुरू आहे. यातच राज्यासह जिल्हाबंदीमुळे चोहीकडे नाकाबंदी करण्यात आली आहे.