चंद्रपूर - "जाती न पूछो साधु की पूछ लीजिये ज्ञान, मोल करो तलवार का पड़ा रहन दो म्यान" सहाशे वर्षांपूर्वी संत कबीर यांनी सांगितलेला मर्म अजूनही ताजा आहे. एकविसाव्या शतकात देखील हिंदू-मुस्लिम, मंदिर-मशिदी या विषयावर भांडणे सुरू आहेत. कुठे दलित नवरदेव घोडीवर चढला म्हणून त्याचा जीव जातो तर कुठे महिलांना धार्मिकतेच्या जोरखंडात बांधून त्यांचे शोषण केले जाते आहे. आपल्या देशातील विषमतेचा सन्मान करण्याऐवजी या विषमतेचे विष कालाविण्याचे काम अधिक होत आहे. ज्यात मानवता भरडली जात आहे. जर मानवतेचाच बळी जात असेल तर मला जातही नको आणि धर्मही नको. अशी भूमिका एका अधिवक्त्या युवतीने घेतली आहे. इतक्यातच ती थांबली नाही तर जात आणि धर्म विरहित प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तिने संघर्ष सुरू केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी तामिळनाडूमध्ये एका महिलेने अशाच पद्धतीचा संघर्ष केला, अनेक वर्षे न्यायालयीन लढाई लढल्यानंतर त्यांना हे प्रमाणपत्र मिळाले आहे. असे प्रमाणपत्र मिळविणाऱ्या भारतातील पहिल्या महिला त्या आहेत, आता यासाठी महाराष्ट्रातील अॅड. प्रीतिशा सहा यांनी पाऊल उचलले आहे.
कोण आहेत प्रितिशा सहा - प्रीतिशा सहा ह्या स्वतः वकील आहेत. मानवीहक्क या विषयात त्या वकिली करीत आहेत. त्यांचा जन्म हा एका उच्चवर्णीय सुखवस्तू कुटुंबात झाला. आजोबा स्वातंत्र्यसेनानी तर आईवडील खुल्या विचाराचे, त्यामुळे मानवी स्वातंत्र्यासाठी खुले वातावरण होते. एक स्त्री या नात्याने त्यांना कुठलेही बंधने नव्हती. पुणे येथे कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्या चेन्नई येथे कायद्याच्या विद्यार्थ्यांना शिकवत होत्या. त्यानंतर त्यांनी चंद्रपुरात परत येऊन जिल्हा सत्र न्यायालयात आपला वकिली व्यवसाय सुरू केला आहे.
आंबेडकर, पेरियार यांचा प्रभाव - अॅड. प्रीतिशा सांगतात पदवीच्या शेवटपर्यंत त्यांना आपली जात कधी माहिती पडली नाही. मात्र जेव्हा त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वाचायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना कळले की देशात जातिवादाच पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत. खालच्या जातींवर किती अन्याय, अत्याचार केले जातात, याचे सामाजिक भान त्यांना आले आणि येथून त्यांच्या विचारांची ठिणगी पडली. त्यानंतर त्यांनी पेरियार स्वामी यांचे साहित्य वाचले आणि जातिवादामुळे या देशाची किती अधोगती झाली आणि तो संपविण्यासाठी काय करावे लागेल ही दृष्टी स्पष्ट झाली. एका सवर्ण कुटुंबात जन्मलेल्या अॅड. प्रीतिशा यांना जातिवादाची सामाजिक रचना स्पष्टपणे समजायला लागली.
का उचलले पाऊल -भारतीय संविधान अनुच्छेद 25 नुसार भारतीय नागरिकाला कुठलाही धर्म निवडण्याचा आणि आचरण करण्याचा अधिकार आहे. एखादा व्यक्ती हा कुठला धर्म आणि जाती न पाळत देखील जगू शकतो. मात्र अशा व्यक्तीची कागदोपत्री काहीच ओळख नसते. प्रत्येक फॉर्ममध्ये धर्माचा कोलम असतो मात्र त्यांना धर्मविरहित लिहिण्याचा कुठलाही पर्याय नाही. आज देशात अशी अनेक लोक आहेत जे कुठलाही धर्म आणि जात मानत नाहीत, अशा वर्गाची ओळख समाजाला पटावी. त्यांच्यातला न्यूनगंड निघावा, समाजाने त्यांना स्वीकारावे, ही एक व्यापक मोहीम व्हावी यासाठी अॅड. प्रीतिशा यांनी हे पाऊल उचलले आहे.