चंद्रपूर Chandrapur Tiger: चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (Tadoba Andhari Tiger Reserve Project) तसेच चंद्रपुरातील इतर जंगलातील वाघांनी अनेक ठिकाणी स्थलांतर केलं आहे. लगतचे तेलंगाना राज्य असो की, मध्यप्रदेश येथे देखील वाघांनी प्रवास केला आहे. मात्र आता एका वाघाने चक्क ओडिसा राज्य गाठल्याची माहिती समोर आली आहे. सिंदेवाही येथून निघालेल्या या वाघाने तब्बल दोन हजार किलोमीटरचा प्रवास करत आणि चार राज्यांचे अंतर पार करत थेट ओडिसामध्ये धडक दिली. याबाबतचे अधिकृत पुष्टी वनविभागाने केली आहे.
वाघाने केला दोन हजार किलोमीटरचा प्रवास : ओडिशाच्या जंगलात 'रॉयल बंगाल टायगर' दिसल्याची माहिती, एका वनअधिकाऱ्याने दिली होती. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. योग्य अधिवास आणि जोडीदाराच्या शोधात वाघ स्थलांतर करतात. मात्र असे करताना काही वाघ शेकडो किलोमीटरचे अंतर पार करतात. यापूर्वी चंद्रपूरातुन स्थलांतर केलेल्या वाघाने मध्यप्रदेश, तेलंगणा राज्य गाठले. त्यांना जाण्यासाठी कॉरिडॉर (दोन जंगलांना जोडणारे उथळ जंगल) असल्यानं, अनेक वाघ तशी भ्रमंती करू शकतात. मात्र ब्रम्हपुरी उपविभागात येणाऱ्या एका वाघाने तब्बल दोन हजार किलोमीटरचे अंतर गाठत चक्क ओरिसा राज्य (Odisha State) गाठलं.
अशी पटली ओळख :वाघांवर नजर ठेवण्यासाठी त्यांना रेडीओ कॉलर लावले जाते. त्यामुळं हा वाघ कुठे स्थलांतर करत आहे याचे रेडिओ संकेत मिळत असतात. परंतु ब्रह्मपुरी जंगलातील या वाघाला रेडिओ-कॉलर नव्हता. मात्र त्याच्या पट्ट्यांच्या पॅटर्नवरून ओडिसात आलेला हा वाघ ताडोबातील जंगलातील असल्याची ओळख पटली. ओरिसा राज्यातील गजपती भागात काही दिवसांपूर्वी एका वाघाने गाईची शिकार केली होती. या भागात वाघ नसल्यानं वनविभागाने कॅमेरा ट्रॅप लावून या वाघाचा शोध घेतला. मात्र कॅमेरात आलेला वाघ हा अनोळखी असल्यानं त्याची ओळख पटविण्यासाठी त्याचा फोटो वाइल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे पाठविण्यात आले. अंगावर असलेल्या पट्ट्यावरून हा वाघ चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी 21 असल्याची पुष्टी करण्यात आली.