चंद्रपूर : संस्थाचालकांच्या चुकीच्या धोरणामुळे शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. मागील चार वर्षांपासून शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा पगारच नियमित झालेला नाही. त्यातही सलग 15 महिन्यांचा एकही रुपया जमा झाला नाही. या विरोधात या सर्व कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. जर आमच्या समस्या त्वरित सोडविल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
प्रा. धनंजय मेश्राम बोलताना... या आहेत मागण्या 1)डिसेंबर 2016 पासूनचे सर्व थकीत वेतन कर्मचाऱ्यांना देण्यात यावे.
2)थकीत ईपीएफ रकमेसोबत कर्मचाऱ्यांची अतिरिक्त 12 टक्के रक्कम पूर्ववत जमा करण्यात यावी.
3)जिल्हाधिकारी, विद्यापीठ तक्रार निवारण तथा AICTE समितीच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी.
4)कर्मचाऱ्यांच्या मूलभूत अधिकारांचा बळी घेणारा सेवाशर्ती कायदा महाविद्यालयाने तत्काळ रद्द करावा.
5)सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफ आणि ग्रॅच्युइटीची रक्कम सेवानिवृत्तीच्या दिवशीच अदा करण्याची व्यवस्था करण्यात यावी.
6)2008 पासूनच्या महाविद्यालयाच्या ताळेबंद आर्थिक अहवालाची प्रत कर्मचाऱ्यांना प्रस्तुत करण्यात यावी.
7)कर्मचाऱ्यांच्या माथ्यावर जबरीने थोपल्या गेलेल्या बँकेतील ओडीचा बोजा काढून तत्काळ निरंक करण्यात यावा.
8)मृतक कर्मचाऱ्यांच्या परिवाराला दिलासा देणाऱ्या अनुकंपा तत्वानुसार सामावून घेतलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात यावे.
9)अनेक वर्षांपासून अस्थायी स्वरूपात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात यावे
10)अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावी.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे केंद्रीय अर्थमंत्री असताना तत्कालीन अर्थ राज्यमंत्री स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांनी चार दशकांपूर्वी चंद्रपूर सारख्या दुर्गम भागात राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. याच महाविद्यालयातून शिकून अनेक विद्यार्थ्यांनी जगभरात आपले नाव कमावले. अत्यंत प्रतिष्ठित आणि उत्कृष्ट दर्जाची समजल्या जाणाऱ्या या संस्थेला आज घरघर लागली आहे. शांताराम पोटदुखे यांचे निधन झाल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होणे सुरू झाले.
मागील चार वर्षांपासून येथे कार्यरत प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे पगार नियमित झालेले नाहीत. त्यातही 15 महिने त्यांच्या पगार म्हणून एक रुपया जमा झाला नाही. या संस्थेत जवळपास 250 कर्मचारी आहेत. त्यातील अनेकजण हे वर्षांचे दोन ते अडीच लाख आयकर भरतात. मात्र, आता त्यांचा वर्षांचा पगार हा हजारांच्या घरात आला आहे. त्यातही घराचे कर्ज, जीवन विमा, मुलांचे शिक्षण असे अनेक खर्च त्यांच्यासमोर आहेत. ते भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. कर्मचाऱ्यांनी पगाराची मागणी केली तर संस्थेच्या व्यवस्थापनाकडून थातुरमातुर पैसे दिले जाते, ही मागणी धरून ठेवणाऱ्यांना थेट कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जाते, त्यांची पगारवाढ थांबविण्यात येते, याच मानसिकतेमुळे दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, असा आरोप या कर्मचाऱ्यांचा आहे. एकेकाळी शिखरावर असलेल्या ही संस्था संस्थेच्या व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणामुळे आज याला घरघर लागली आहे. त्यामुळेच या सर्व कर्मचाऱ्यांनी मागील 36 दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.