चंद्रपूर :अपघातामध्ये मृत्यूमुखी झालेल्या महिलेवर मानसिक औषधोपचार सुरू होते. ती नेहमी नदी-नदी करत असायची, अशी माहिती समोर येत आहे. महिलेला नदीची ओढ लागली होती. मात्र ती गर्भवती असल्याकारणानं या गोळ्या बंद करण्यात आल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घटनेला आता वेगळे वळण लागले आहे. त्या दृष्टीने आता पोलीस तपास करणार आहेत.
सुषमा काकडे या बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथे आपले पती आणि चार वार्षिय मुलासोबत राहायच्या. 18 ऑक्टोबरच्या सायंकाळी मुलाने चॉकलेटची मागणी केल्याचं पतीला सांगत त्या आपल्या मुलाला घेऊन दुचाकीने बामणी ते राजुरा या मार्गाने निघाल्या. मात्र या मार्गावरील पुलावर त्यांचा अचानक तोल गेला. आपल्या मुलासह त्या दुचाकी घेऊन पुलाखाली कोसळल्या. विशेष म्हणजे पडताना त्या मानेच्या भारावर कोसळल्या. हा भाग अत्यंत नाजूक असल्याने पाठीचा मणका तुटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ज्या ठिकाणी नदीच्या पात्रात त्या कोसळल्या तिथे घट्ट चिखल होता.
चिमुकला आईच्या मृतदेहाजवळ रात्रभर बसून-महिलेच्या शरीराच्या कुठल्याही भागावर कोसळल्या असत्या तरी वाचण्याची शक्यता अधिक होती. कारण त्यांच्या शरीरावर अन्य कुठल्याही जखमा नाहीत. शवविच्छेदन करताना अशा कुठल्याही मोठ्या खाणाखुणा त्यांच्या शरीरावर नव्हत्या. मुलगादेखील याच चिखलात कोसळला. त्याला काही झाले नाही. मात्र रात्रभर हा चिमुकला आपल्या आईला पकडून टाहो फोडत होता. मात्र त्याचा आक्रोश कुणाच्या कानावर गेला नाही. सकाळपर्यंत हा चिमुकला आईच्या मृतदेहाजवळ बसून रडत होता. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी यावरून जात असणाऱ्या लोकांना ही बाब निदर्शनास आली. त्यांना सर्वांना मोठा धक्का बसला. याची माहिती बल्लारपूर पोलिसांना देण्यात आली. यानंतर आई आणि मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी आईला मृत घोषित केले. तर मुलावर बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.