चंद्रपूर : कुठलाही धर्म, पंथ, भाषा याला झुकते माप न देता, पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन न बाळगता, कुठलाही भेदभाव न करता कर्तव्य बजावण्याची जबाबदारी भारतीय संविधानाने पोलीस विभागाला दिली आहे. मात्र धार्मिक विषमतेचे विष सभोवताली पेरले जात असताना पोलीस विभागातही हे विष बेमालूमपणे पसरले की काय? असे म्हणायची वेळ चंद्रपूरमध्ये आली आहे.
देवस्थानात अतिरेकी हल्ल्याचे मॉकड्रील :आतंकवादाला कुठला धर्म नसतो असे म्हणतात. मात्र चंद्रपूर पोलिसांनी या आतंकवादावर एका विशिष्ट धर्माचा शिक्कामोर्तब केला. देवस्थानात अतिरेकी हल्ल्याचे मॉकड्रील करताना चक्क मुस्लिम समाजाला आंतकवादी म्हणून दाखविण्यात आले. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही. आंतकवादी झालेल्या पोलिसांनी 'अल्लाह हो अकबर' अशा घोषणासुद्धा दिल्या. या प्रकारावर प्रतिष्ठित वकिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
अल्लाह हो अकबरच्या घोषणा : चंद्रपूर पोलिसांनी ११ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध महाकाली देवस्थानावर अतिरेकी हल्याचे मॉक ड्रील केले. यात मोठ्या संख्येत पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपाई सहभागी झाले होते. आंतकवाद्यांचा हल्ला मोडून काढण्यासाठी जी यंत्रणा पोलीसांनी हवी, त्या सर्वांचा वापर या मॉकड्रीलमध्ये करण्यात आला. महाकाली मंदिर परिसरात अतिरेक्यांनी काही सामान्य लोकांना बंधक बनवले. या सामान्य नागरिकांची सुटका करून अतिरेक्यांना अटक करण्याची तालीम या मॉकड्रिलमध्ये करण्यात आली. हे अतिरेकी बंधक बनविलेल्या नागरिकांसमोर "अल्ला हु अकबर" अशी नारेबाजी करतात हे देखील या मॉकड्रिलचा एक महत्वाचा भाग होता. मात्र हे संपूर्ण नाट्य घडत असताना काही सामान्य नागरिकांनी हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांच्या या पूर्वग्रहदूषित मानसिकतेने केलेल्या कृत्यावर आता मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.