चंद्रपूर : येथील युवक काँग्रेसचा प्रदेश सचिव सचिन कत्याल याचे नाव वाळूतस्करीत समोर आले असून या प्रकरणात त्याला सहआरोपी करण्यात आले आहे. मात्र, चार दिवस लोटूनही अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, अशा परिस्थितीतही कत्याल याने आज 'फेसबुक'वर आवर्जून पोस्ट केली. काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्याबद्दल त्याने नवनियुक्त शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांना भरभरून शुभेच्छा दिल्या. यानंतर काही वेळाने त्याने ही पोस्ट डिलीट केली. मात्र, अजूनही अटक न होऊ शकलेल्या कत्यालने या पोस्टच्या माध्यमातून पोलिसांनाच वाकुल्या दाखवल्या आहे.
रामनगर पोलिसांनी शुक्रवारी अजयपूरजवळ अंधारी नदीतील वाळूतस्करीची मोठी कारवाई केली. यात तुळशीराम देवतळे आणि आदिल खान यांना अटक करण्यात आली. मात्र, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन कत्यालचे नाव समोर आले, तेव्हा या प्रकरणाला वेगळे वळण लागले. यातील जेसीबी ही सचिन कत्याल याच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार रामनगर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री कत्याल आणि निशांत आंबटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर, कत्यालला सहआरोपी करण्यात आले आहे.