चंद्रपूर -26 जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून ओळखला जातो. या माध्यमातून जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्ह्यात 80 किलो गांजा नष्ट करण्यात आला. 1 एप्रिल 2015 ला जिल्ह्यात दारुबंदी घोषित करण्यात आली होती. तसेच पोलिसांकडून चरस, गांजा, ब्राऊन शुगर अशा अमली पदार्थांवर कारवाई करण्यात येते.
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने अमली पदार्थांना जाळून होळी करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, झोपडपट्टी इत्यादी ठिकाणी अमली पदार्थाच्या सेवनाने शरिरावर होणारे दुष्परिणाम याबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रमुखांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.
न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन बल्लारशाह येथील 2 गुन्ह्यातील 79 किलो 675 ग्रॅम ओलसर गांजाचा पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथील परेड ग्राउंडवर अमली पदार्थाची विल्हेवाट करण्याच्या कार्यपध्दतीची अंमलबजावणी करून नाश करण्यात आला.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस उपअधिक्षक शेखर देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी (राजुरा) स्वप्नील जाधव , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे उपस्थितीत होते.
दरवर्षी 26 जून हा दिवस जगभर जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध विधायक उपक्रमांच्या स्वरुपात साजरा केला जातो. युनोने 1988 साली याची घोषणा केली. 26 जून या दिवसाला चीनमधील पहिल्या अफू युद्धाच्या काळात (1987) अफू व्यापारावर घातल्या गेलेल्या बंदीचा संदर्भ आहे.