चंद्रपूर- मान्सूनच्या पावसाने दडी मारल्याने याचा सर्वाधिक फटका चंद्रपूरकरांना बसत आहे. गेले अनेक दिवस चंद्रपूरचे तापमान शिगेला पोहोचले असून आज पुन्हा येथे विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे 44.3 डिग्री तर चंद्रपुरात 44 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली. वाढलेला उकाडा आणि उष्णतेची दाहकता या दोन्ही गोष्टींचा सामना चंद्रपुरकरांना करावा लागत आहे.
उकाड्याने 'बेजार' झालेल्या चंद्रपूरकरांना मान्सूनची प्रतीक्षा - पाऊस
मान्सूनच्या पावसाने दडी मारल्याने याचा सर्वाधिक फटका चंद्रपूरकरांना बसत आहे. गेले अनेक दिवस चंद्रपूरचे तापमान शिगेला पोहोचले असून आज पुन्हा येथे विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे 44.3 डिग्री तर चंद्रपुरात 44 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या पावसाला सुरूवात होते. चंद्रपूरचे तापमान उन्हाळ्यात 48 ते 49 डिग्री पर्यंत जाते. अशावेळी उन्हाच्या झळा सोसणाऱ्या चंद्रपूरकरांना या मान्यूनच्या पावसाचा मोठा दिलासा मिळतो. मात्र, चंद्रपूरकरांच्या पदरी यावेळी निराशा पडली. मान्सून एक आठवडा लांबणीवर जाणार असल्याचे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, दहा दिवस लोटूनही अद्याप चंद्रपुरात दमदार पाऊसाची नोंद झाली नाही. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा आणि कमालीची आद्रता या दोन्ही बाबींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे ज्या प्रमाणात शहर तापते त्या वेगाने याचा पारा खाली उतरत नाही. त्यामुळे किमान तापमानात चंद्रपूर हे नेहमी विदर्भात सर्वात अग्रेसर असते. सभोवताली असलेल्या कोळसा खाणी, देशातील सर्वात मोठे औष्णिक वीज केंद्र आणि इतर कारखाने असल्याने किमान तापमान हे सर्वाधिक असते. त्यामुळे सध्या चंद्रपूरकरांना मोठ्या समस्येला समोर जावे लागत आहे. आज पुन्हा विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात झाली आहे. वाढलेला उकाडा आणि उष्णता यापासून त्वरित दिलासा मिळावा, यासाठी चंद्रपुरकर पावसाची प्रतिक्षेत आहेत.