चंद्रपूर - कोवीड रुग्णांना बेकायदेशीररित्या हॉस्पिटलमध्ये भरती केल्याचे प्रकरण उघडकीस आले असताना महानगरपालिका प्रशासनाने डॉ. आइंचवार यांच्या सीएचएल हॉस्पिटलला आठ दिवसांसाठी निलंबित केले होते. मात्र तीन दिवसांपूर्वीच हे निलंबन मागे घेण्याचा अजब निर्णय मनपाने घेतला आहे. मनपाची ही कृपादृष्टी कुणाच्या आशीर्वादाने? यावर आता चर्चा सुरू झाली आहे.
हृदयरोगावर उपचारार्थ प्रसिद्ध असलेले डॉ. रोहन आईंचवार यांच्या सीएचएल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी प्रमाण पत्र महानगरपालिकेने 4 मे ला पुढील आठ दिवसांसाठी म्हणजे 11 मेपर्यंत निलंबित केले होते. डॉ.रोहन आईंचवार यांनी बेकायदेशीररित्या कोविड रुग्णांची भरती केली होती, म्हणून ही कारवाई आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात डॉ. नैना उत्तरवार, डॉ. अतुल चुटकी व लिपिक सतीश अलोणे यांनी केली. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यावर जिल्हा शल्यचिकित्सकांनी कोविड रुग्णांचा उपचार करणाऱ्या सर्व हॉस्पिटलची परवानगी रद्द करीत, नियमित सराव (प्रॅक्टिस)सुरू करण्याच्या सूचना बहाल केल्या होत्या. परंतू महानगरातील डॉ.आईंचवार व डॉ. विनोद नगराळे यांच्याकडे कोविड रुग्ण असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाला मिळाली होती. मनपाच्या आरोग्य विभागाने याची पडताळणी केली असता तथ्य आढळून आल्यावर 24 एप्रिल 2022 ला डॉ आईंचवार यांना 25 हजार रु दंड ठोठावून 8 दिवसांसाठी बाह्यरुग्ण सेवा बंद करण्यात आली व नोंदणी प्रमाणपत्रही रद्द करण्यात आले. निलंबन कालावधीत जे रुग्ण भरती होते. त्यांचा उपचार सुरू राहील असेही मनपाने नमूद केले होते. 11 मे पर्यंत निलंबन केले असताना सोमवार 9 मे पासून बाह्यरुग्ण (ओपीडी) सेवा पूर्ववत करण्याची परवानगी मनपाने बहाल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.