चंद्रपूर :कचरा संकलन घोटाळा झाल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेले होते. न्यायालयाने निकाल विरोधात दिल्यामुळे मनपाचे कोट्यावधी रुपय बचत झाले आहे. तसेच भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढ्याला यश आल्याने जनविकास सेनेतर्फे पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात मनपासमोर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता दरम्यान मिठाई वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जनविकास सेनेचे घनश्याम येरगुडे,मनिषा बोबडे, अक्षय येरगुडे, इमदाद शेख, प्रफुल बैरम, गितेश शेंडे,निलेश पाझारे, अमोल घोडमारे, रवी काळे ,कविता अवथनकर, मेघा मगरे, माया बोढे, स्नेहल चौथले, बबिता लोडेल्लीवार भाग्यश्री मुधोळकर, रमा देशमुख आदी उपस्थित होते.
भ्रष्टाचार झाल्याचा आरोप :कचरा संकलन, वाहतुकीचे सुमारे 100 कोटी रुपयांचे सात वर्षाचे कंत्राट 1 हजार 700 रुपये प्रति टन दराने स्वयंभू एजन्सीला देण्यात आले होते. यात 3 वर्षे मुदतवाढीची तरतूद कंत्राटामध्ये होती. मात्र, पहिली निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबण्यात आली होती. नंतर 2 हजार 800 रुपये प्रति टन दराने स्वयंभू एजन्सीला हे काम देण्यात आले होते. प्रत्येक टनामागे 1 हजार 100 रुपये वाढल्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तत्कालीन शहर विकास आघाडीचे गटनेते जनविकास सेनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला होता.
नव्याने निविदा प्रक्रिया :अनेक राजकीय पक्ष, संघटनांनीही या घोटाळ्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर मनपा प्रशासनाने कंत्राटदाराला वाटाघाटीसाठी बोलावून दर कमी करायला सांगितले. मात्र, कंत्राटदाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. दरम्यान न्यायालयाने कंत्राटदाराच्या बाजूने आदेश दिला होता. यानंतर मनपाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मनपाच्या बाजूने निकाल दिल्यामुळे हे कंत्राट रद्द होणार असून या कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.