चंद्रपूर - कोरोनाच्या महामारीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सामान्य नागरिकांकडून मनपाने लाखों रुपयांचा दंड वसूल केला. याची अंमलबजावणी अजूनही कठोरपणे सुरू आहे. मात्र, याच नियमांचे उल्लंघन मनपाचे महापौर आणि आयुक्त सर्रासपणे करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. चमकोगिरी करण्याच्या नादात मनपाच्या महापौर आणि आयुक्तांनी मास्क न घालता सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत फोटोसेशन केले आहे. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच सामान्य नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. त्यानंतर ही होणारी नाचक्की रोखण्यासाठी महापौर आणि आयुक्तांनी प्रत्येकी ५०० रुपय दंड भरून या प्रकरणाची तडजोड केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
कोरोनाच्या महामारीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चंद्रपूर शहरात ही संख्या सर्वाधिक आहे. सध्या राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. त्यामुळे सर्व व्यवहार, व्यापार ठप्प आहे. विनाकारण घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे, तसेच मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाते, त्यांना हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जातो. नाकाच्या खाली मास्क गेलेल्यावर देखील कठोर कारवाई केली जात आहे. लपून दुकाने, प्रतिष्ठाने सुरू ठेवणाऱ्यांवर देखील कारवाई होत आहे.
कोविड रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात नियम पायदळी-
कोरोना रोखण्यासाठी ही कारवाई अत्यंत गरजेची आणि महत्वाची आहे. त्याची अंमलबजावणी होत आहे ते योग्यच आहे. मात्र, या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचा विसर महापालिकेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना पडल्याचा प्रकार घडला आहे. 18 मे ला मनपाच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. 'आसरा' नामक या रुग्णालयात 45 खाटांची सुविधा आहे. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वांनी मास्क उतरवत फोटोसेशन केले. यामध्ये शहराच्या प्रथम नागरिक राखी कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेवक संदीप आवारी, काँग्रेसचे गटनेते सुरेश महाकुलकर, नगरसेवक सुरेश पचारे, अनिल फुलझेले, संजय कंचर्लावार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे तसेच इतर काहींचा समावेश होता.