चंद्रपूर- वैद्यकीय रुग्णालयात स्पष्टपणे भ्रष्टाचार झाला असल्याचे निदर्शनास येऊन देखील वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी याची चौकशी करण्याऐवजी या पत्राला केराची टोपली दाखवली. असे करीत त्यांनी या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे काम केले. त्यामुळे त्यांना भारत सरकारने दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी कामगार नेते पप्पू देशमुख यांनी महामहीम राष्ट्रपती यांना पत्र लिहून केली आहे.
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० च्या जवळपास कंत्राटी कामगारांचे मागील ७ महिन्यांपासून पगार थकीत आहेत. यापूर्वी सुद्धा कामगारांचे ६ महिने पगार थकीत होते. ६ महिन्यांचे पगार थकीत असताना एप्रिल २०२० मध्ये प्रदीप खडसे या कामगाराचा घरी तसेच ऑगस्ट २०२० मध्ये संगीता पाटील या महिला कामगाराचा कामावर असताना रुग्णालयात जागेवर कोसळून मृत्यू झाला. या दोन्ही कामगारांचा आर्थिक व मानसिक तणावाने मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याचा आरोप जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला आहे. यावेळी ७ महिन्यांपासून पगार थकीत असल्याने सर्व कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली असुन थकीत पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी कामगारांनी ८ फेब्रुवारी २०२१ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'डेरा आंदोलन' सुरू केले.आंदोलनादरम्यान आतापर्यंत ४ कामगारांची प्रकृती बिघडलेली आहे.
जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे तक्रार
वैद्यकीय महाविद्यालयात जुलै २०१९ मध्ये कंत्राटी कामगार पुरविण्याच्या कामांमध्ये किमान वेतनापेक्षा कमी दराच्या निविदेला मंजुरी देण्याचा भ्रष्टाचार झाला. या भ्रष्टाचाराची पप्पू देशमुख यांनी जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे तक्रार केल्यानंतर समितीचे तत्कालीन अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी तक्रारीमध्ये तथ्य आढळल्याने पुरावे तपासून अहवाल सादर करण्याबाबतचे पत्र वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.तात्यासाहेब लहाने यांना दिले. मात्र, डॉ.लहाने यांनी समितीने दिलेल्या पत्राला तसेच त्यानंतर पाठवलेल्या दोन स्मरणपत्रांना केराची टोपली दाखविली.