चंद्रपूर - जोगापूरला देवदर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना दररोज वाघाचे दर्शन होत असल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, कोणतेही अनुचित प्रकार टाळण्यासाठी भक्तांना वनपरिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच फक्त दर्शनासाठी परवानगी देण्यात आली असून यात्रा स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
राजुरा तालुक्यातील जोगापूर-रिठ वनक्षेत्रात येणाऱ्या हनुमान देवस्थान येथे मार्गशीर्ष महिन्यात मोठा यात्रा महोत्सव असतो. हे देवस्थान निसर्गरम्य असल्याने या ठिकाणी भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र, वनक्षेत्रात काही दिवसांपासून वाघाने धुमाकूळ घातल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून यात्रा बंद केली आहे. काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी झाले होते.