चंद्रपूर - कोरोना विषाणू विरुद्ध सुरू असलेला लढा पुढील 3 मे पर्यंत कायम ठेवायचा असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमध्ये कोणतीही शिथीलता नाही. 3 मे पर्यंत कोणीही घराबाहेर पडणार नाही. याची खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे. चंद्रपूर जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये येत असल्याने येथे संचारबंदीपासून मोठा दिलासा मिळण्याची आशा अनेकांना होती. मात्र, यात चंद्रपूर जिल्हावासीयांच्या पदरी निराशा पडली आहे.
ग्रीन झोन चंद्रपूर; 3 मे पर्यंत कुठलीही शिथिलता नाही, लॉकडाऊन आणखी कडक होणार - chandrapur corona
चंद्रपूर जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये येत असल्याने येथे संचारबंदीपासून मोठा दिलासा मिळण्याची आशा अनेकांना होती
लॉकडाऊन संदर्भात कोणत्याही अफवांना बळी पडू नये. राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यांमध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे. लॉकडाऊन शिथील करण्याबाबत व त्यामध्ये काही विशिष्ट सूट देण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच लॉकडाऊन कायम राहील. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र कोरोना विषाणूच्या उद्रेकाला वेळ लागत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून 3 मेपर्यंत काटेकोरपणे लॉकडाऊन पाळण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.
याउलट पोलीस प्रशासनाने कारवाई कठोर करण्याचा निर्णय घेतला असून विनाकारण रस्त्यावर फिरणा-यांवर सक्त कारवाई करण्यात येईल. जीवनावश्यक वस्तूंची सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत ठेवलेली वेळ तशीच राहील. अन्य कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी 3 मेपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या स्पष्ट निर्देशाची वाट बघावी, असे डॉ. खेमणार यांनी स्पष्ट केले आहे.