राजुरा (चंद्रपूर) - मागील चार महिन्यांपासून तेलंगणात अडकलेल्या हजारो मजुरांचे लोंढे चंद्रपूर जिल्ह्यातील पोडसा येथे दाखल झाले. एकाच वेळी आलेल्या हजारोंच्या लोंढ्यांना सांभाळणे प्रशासनाचा आवाक्याबाहेरच होते. अशा आणीबाणीच्या स्थितीत एका देवदूताचा मदतीचा हात पुढे आला. सतत आठ दिवस कुठलीच पर्वा न करता स्वत:चे हजारो रूपये खर्च करत त्याने मजुरांना दिलासा दिला. तो हात होता पोडसा येथील देविदास सातपुते यांचा. सातपुते यांच्या सामाजिक बांधिलकीची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री यांच्या हस्ते सातपुते यांचा सन्मान करण्यात आला.
कोरोनान सारे जग एकमेकांपासून दूर गेलेय. जवळच्यांच्या मरणयातनाही नकोशा झाल्या. गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाच्या हजारो करूण कहाण्या समाजमन अक्षरश सुन्न करणाऱ्या ठरल्या. कुणी अनवाणी पायांनी हजारो किलोमीटरचा रस्ता गाठला. तर काहींना गावकुसाबाहेरच जीवन जगावे लागले. कामावर दूर गेलेल्या गरीब महिलेला पतीच्या मृत्युनंतर दर्शन घेता आले नाही. या अन अशा असंख्य वेदनांचा पाढा नुसता ऐकला की, अंगावर चटकन काटे येतात. पण समाजात आजही माणुसकी जीवंत आहे. त्यांच संवेदनशील मन व्यवस्थेच्या गर्दीत अगदी फुलतय. कोरोनाच्या काळात असेच एक व्यक्तीमत्व बघायला मिळाले. ते म्हणजे पोडस्याचे देविदास सातपुते.
पालकमंत्र्यांनी केला टाळेबंदीतील देवदुतांचा सन्मान
सतत आठ दिवस कुठलीच पर्वा न करता स्वत:चे हजारो रूपये खर्च करत त्याने मजुरांना दिलासा दिला. तो हात होता पोडसा येथील देविदास सातपुते यांचा. सातपुते यांच्या सामाजिक बांधिलकीची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री यांच्या हस्ते सातपुते यांचा सन्मान करण्यात आला.
मिरचीच्या हंगामासाठी तेलंगणात गेलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली. तब्बल पंचेचाळीस दिवसाचा लाॕकडाऊननंतर केंद्र सरकारने परराज्यातील मजुरांना आणण्यासाठी पाऊल उचलले. या आदेशानंतर खासगी वाहनाने हजारो मजुरांचे लोंढे महाराष्ट्र-तेलंगणा सीमेच्या वर्धा नदीकाठावरील पोडसा गावात धडकले. अचानकपणे एवढ्या मोठ्या संख्येत मजूर आल्याने गावात भीती पसरली. मजुरांचे जत्थेच्या जत्थे पाहुन प्रशासनही भांबावले. अशा स्थितीत पोडसा येथील देविदास सातपुते हा तरुण समोर आला. मुख्य मार्गालगत असलेल्या व्यवसायाची खोली आणि परिसरातील आपली जागा मजुरांसाठी खुली केली. संकटकाळात प्रशासनाला मदतीचा हात देत तब्बल सहा दिवस हजारो मजुरांना मायेचा घास भरविला. यावेळी मजुरांचे लोंढे सीमेवर आल्याचे समजताच पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांच्यासह प्रशासकीय यंत्रणा पोडस्याकडे धावली. लोकप्रतीनिधिंसह अधिकाऱ्यांनी देखिल देविदासची धावपळ बघितली,अन तोंडभरून कौतुक केले.
यानंतर पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून गावोगावच्या हजारो मजुरांना पोहोचविण्यात आले. सतत सहा दिवस चाललेल्या या मोहिमेत हजारो मजुरांसाठी देविदास खऱ्या अर्थाने "देवदूत" ठरले. मजुरांसाठी देविदासने मजुरांना तांदूळ, तेल, जेवणासाठी लागणारे साहित्य सतत सहा दिवस पुरविले. कर्तव्यावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली. संकटकाळातील देविदासच्या या बहुमूल्य मदतीची प्रशासनाने दखल घेतली. सीमेवरील पोडसाचे उपसरपंच देविदासचा नुकताच स्वातंत्र्य दिना निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला.यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे,जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी आदींची उपस्थिती होती.
सेवेमुळे समाधान लाभले
कोरोना महामारीत राज्य सरकारच्या तत्कालीन आव्हाहनानंतर आपणही समाजाचे देणे लागतो,या भावनेतून मी आणि माझे कुटुंबीय मजुरांच्या सेवेसाठी पुढे आलो.यातून मनस्वी समाधान लाभले असे मत देविदास सातपुते (उपसरपंच,पोडसा )यांनी व्यक्त केले.