राजूरा (चंद्रपूर) -घरकुल बांधकामासाठी अनेकांनी राहते घर पाडले. सुरवातीला वीस हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यानंतर मात्र निधीच मिळाला नाही. राहते घर गेले अन् बांधकामही अडले. अशा स्थितीत अनेकांनी तात्पुरती झोपडी उभारली अन् त्यात संसार मांडला. अख्खा पावसाळा झोपडीत काढला. निधीची आस लावून बसलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील शेकडो घरकुल लाभार्थ्यांची वाताहत सुरू आहे.
रमाई आवास योजना : घरकुलासाठी राहते घर पाडले अन् आता राहतात झोपडीत.. - चंद्रपूर घरकुल लाभार्थी लेटेस्ट न्यूज
रमाई आवास योजनेतील वीस हजार रुपयांचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना प्राप्त झाला. या वीस हजार रुपयांत जवळची रक्कम टाकून घराचे बांधकाम सुरू केले. मात्र, त्यानंतर निधीच प्राप्त झाला नाही. 523पैकी आजघडीला 425 घरे अर्धवट स्थितीत उभी आहेत. निधी नसल्याने बांधकाम अडले. जवळचा पैसाही संपला, त्यात राहते घरही गेले. अशा बिकट अवस्थेत अनेकांनी इतरांच्या जागेवर तात्पुरती झोपडी उभी केली. या झोपडीत अख्खा पावसाळा त्यांनी काढला.
गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील दयाशंकर ऋषी झाडे यांना आता राहण्यासाठी स्वतःची जागा नसल्याने घराजवळ असलेल्या जागेवर त्यांनी झोपडी उभी केली. आनंद रमेश कुकूडकार यांची अवस्थाही सारखीच. पंचायत समिती गोंडपिपरी येथे वारंवार घरकुल लाभार्थी चकरा मारत आहेत. 'साहेब, निधी आला का?' हा त्यांचा नेहमीचा प्रश्न. या प्रश्नाचे अधिकाऱ्यांचे उत्तरही ठरलेले. 'सध्या निधी नाही; मात्र पुढील महिन्यात येणार'. शेकडो लाभार्थी निधीची आस लावून बसले आहेत. कोरोनाच्या संकटात हातांना रोजगार नाही. त्यात राहायला हक्काचे घरही नसल्याने घरकुल लाभार्थ्यांची वाताहत होत आहे.
जुनीच घरे अडली, त्यात नवीन 708 घरांना मंजुरी
निधी प्राप्त न झाल्याने 2018-19मधील 425 घरे अर्धवट स्थितीत उभी आहे. अशात 2019-2020 या वर्षात 708 नवीन घरे मंजूर झाली आहेत. या 708 लाभार्थ्यांना अद्याप निधी मिळालेला नाही.