चंद्रपूर : जिल्हा क्रीडा संकुलातील ( Chandrapur district sports complex ) धावपट्टीचे नुकतेच लोकार्पण झाले. मात्र याचा वापर करणाऱ्या खेळाडू आणि सामान्य नागरिकांसाठी तीनशे ते पाचशे रुपये शुल्क लावण्याचा निर्णय जिल्हा क्रीडा संकुलाने घेतल्याने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले. यावर सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असतानाच आज हा मुद्दा विधानसभा अधिवेशनात गाजला. स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी या अन्यायपूर्ण निर्णायाच्या विरोधात विधानसभेत ( winter session ) प्रश्न उपस्थित केला. यावेळी क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी हा शुल्क रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच याबाबत क्रीडा मंत्री महाजन ( Sports Minister Girish Mahajan ) यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांना तात्काळ नागपूरात बोलवले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
क्रीडा अधिकाऱ्यांना सुनावले :जिल्हा क्रीडा संकुलात धावपट्टी म्हणून सिंथेटिक ट्रॅक तयार केला. ही अत्याधुनिक पद्धतीची धावपट्टी असून याच्या लोकार्पण प्रासंगिक चांगलाच राजकीय वाद निर्माण झाला. आमदार किशोर जोरगेवार यांना निमंत्रण न देताच त्यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव छापले. यामुळे संतापलेल्या जोरगेवारांनी यावर निषेध नोंदवत बहिष्कार टाकला. यावेळी त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांना चांगलेच खडेबोल सुनावले. तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तीन तास लोटूनही कार्यक्रमस्थळी न पोचल्याने संतप्त झालेले खासदार बाळू धानोरकर यांनी कुदळ मारून भूमिपूजन केले आणि अधीकारी, जिल्हाधिकारी यांना खडसावत निघून गेले.