चंद्रपूर - नोकर भरती प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना अटक झाल्यानंतर आता संचालक मंडळांनी २४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. या कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस असल्याचा कारणावरून ही कारवाई करण्यात आली. मात्र, दुसरीकडे वैद्यकीय मंडळासमोर येत्या २५ ऑगस्टला या कर्मचाऱ्यांची फेर वैद्यकीय तपासणी होणार आहे. तत्पूर्वीच कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान या निर्णयाच्या विरोधात हे कर्मचारी न्यायालयात जाण्याच्या तयारी आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी आपल्या कार्यकाळात वैद्यकीय कारणावरून स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नोकरीत सामावून घेतले. मात्र, या कर्मचाऱ्यांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन पाल्यांसाठी नोकरी मिळविली, असा आरोप काही संचालकांनी केली. याची तक्रार पोलिसांत केली. या तक्रारीवरून मनोहर पाऊणकर आणि बँकेचे मुख्य कार्यकारी सिद्धार्थ दुबे यांना अटक झाली. सध्या हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहे.