चंद्रपूर-जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या रविवारी सायंकाळपर्यंत ४०३ वर पोहोचली. जिल्हयात कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २४८ झाली आहे. दिवसभरात २८ जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यामध्ये सध्या १५५ बाधितांवर उपचार सुरु आहेत. मूल येथील एका राईसमिल मधील कोरोनाबाधित मजुरांची संख्या आता 24 वर पोहोचली आहे. या रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्याला देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आता समोर आले आहे.
जिल्ह्याचा कोरोना डब्लिंग रेट सध्या १५.३ इतका आहे. आतापर्यंत चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये १०२ रुग्ण आढळून आले आहे. तर जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, राजुरा, भद्रावती, ब्रह्मपुरी, कोरपना, नागभिड, गडचांदूर या शहरांमध्ये १४० रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात ही रुग्णसंख्या १५७ आहे. रविवारी आढळलेल्या बांधितामध्ये चंद्रपूर शहरातील बापुजी नगर, बालाजी वार्ड येथील ३० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या व्यक्तीला कुंटुबातील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातून कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.