चंद्रपूर - काँग्रेस आणि शिवसेनेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. निष्क्रियतेचा ठपका ठेवत काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आणि शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख नितीन मत्ते ह्यांना पदावरून हटवले जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
प्रकाश देवतळेंना हटवण्याची तयारी?
प्रकाश देवतळे हे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ह्यांचे खंदे समर्थक मानले जातात. काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची धुरा त्यांनी दोन वेळा सांभाळली. मात्र त्यांच्यावर कायम निष्क्रियतेचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांना ग्रामीण जिल्हाध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र त्यांच्या संस्थेत आदिवासी विद्यार्थिनींचे लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर आले आणि त्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. यानंतर प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून पुन्हा प्रकाश देवतळे यांना संधी देण्यात आली. तर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून खासदार बाळू धानोरकर यांचे समर्थक समजले जाणारे रामू तिवारी यांना संधी देण्यात आली. मात्र आता देवतळे यांना या पदावरून हटविण्याची तयारी सुरू झाली आहे. या पदासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत तर डॉ. सतीश वारजूरकर यांच्या नावांपैकी एकावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हे पद देवतळे यांच्याकडून लवकरच काढून घेण्याची शक्यता काँग्रेसच्या गोटातून वर्तविण्यात येत आहे.