चंद्रपूर- कोरोनाच्या काळात नागरिक मरणाच्या दारात उभे असताना केवळ औपचारिकतेच्या बैठका आणि अपवाद वगळता सहसा आपल्या कार्यालयातच वेळ काढणारे जिल्हाधिकारी, अशी ओळख निर्माण झालेले अजय गुल्हाने यांना अखेर बाहेर पडण्याचा मुहूर्त सापडला आहे. शुक्रवारी बाहेर पडत त्यांनी एमआयडीसी येथील आदित्य ऑक्सिजन प्लांटला भेट दिली. यावेळी त्यांनी ऑक्सिजनचे उत्पादन किती होते, त्याचे वितरण कसे व कुठे कुठे होते, ही प्रक्रिया समजून घेतली. कोरोनाच्या काळात लोक उपचाराअभावी मरत असताना, कार्यालयातच वेळ काढणारे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आकस्मिक भेट हा अनेकांसाठी आश्चर्याचा मोठा धक्काच होता.
खेमणारांच्या अपेक्षांचा गुल्हाने यांना फटका -
ऑगस्ट 2020 मध्ये डॉ. कुणाल खेमणार यांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली. खेमणार हे कोरोनाची स्थिती अत्यंत जबाबदारीने हाताळत होते. वेळोवेळी बाहेर जाऊन ते कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना देत. त्यांच्या अशा आकस्मिक भेटीमुळे संबंधित यंत्रणा देखील दक्ष असे. कधी ते कोविड केअर केंद्र तर कधी जिल्हा सामान्य रुग्णालय तर कधी वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन पाहणी करून येत. ते स्वतः डॉक्टर असल्याने त्यांना ही स्थिती हाताळण्यास मोठी मदत देखील झाली होती. आजूबाजूला काय घटनाघडामोडी सुरू आहेत, त्याचे समाजमनावर काय प्रतिबंध पडत आहेत, याचाही आढावा ते घेत. यातच सायंकाळी दररोज न चुकता जनतेसाठी ते व्हिडिओ संदेश प्रसारित करायचे. यात ते जनतेला सूचना, मार्गदर्शन करायचे तसेच कुठे काही घटना घडल्या असतील त्यावर योग्य ते भाष्य करायचे. यामुळेच खेमणार यांनी जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यामुळेच त्यांच्या अचानक बदलीमूळे सामान्य नागरिकांत संतापाची लाट निर्माण झाली होती. याचा विरोध सुरू झाल्याच्या काहीच दिवसांत 11 ऑगस्टला अजय गुल्हाने यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. यापूर्वी ते मुंबईत जलस्वराज्य विभागाचे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते. खेमणार यांनी चंद्रपुरकरांवर जी छाप सोडली त्यामुळे कोरोनाच्या कठीण काळात गुल्हाने यांची नेतृत्वक्षमता तपासली जाणार हे निश्चित होते. 11 ऑगस्टला गुल्हाने यांनी सूत्रे हाती घेतली त्यावेळी कोरोना रुग्णांची संख्या ही 898 तर कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर याच्या वीस दिवसांनी म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी ही संख्या तब्बल 2763 तर मृतांचा आकडा हा 29 पर्यंत पोचला. म्हणजे मृतांच्या संख्येत तब्बल सहा पट वाढ झाली तर रुग्णांच्या संख्येत थेट तीन पटीने वाढ झाली होती.
कार्यालयीन कामकाजाची चौकटबद्ध प्रतिमा -
यानंतर देखील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत गेले. मात्र, जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावर स्वतः पुढाकार घेत यात फारसे काही केले नाही. ही संपूर्ण जबाबदारी त्यांनी आरोग्य यंत्रणेवर सोपवली. औपचारिकता म्हणून दररोज कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेणे, लोकप्रतिनिधिंशी कार्यालयात चर्चा करणे, वरिष्ठांना ऑनलाइन मिटिंगमध्ये जिल्ह्याची माहिती देणे, विविध संघटनांचे निवेदन स्वीकारने अशी कार्यालयीन चौकटबद्ध पद्धती त्यांनी स्वीकारली. जे काही प्रश्न असतील ते कार्यालयातच सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. बाकी अपवाद वगळता ते स्वतःहुन फारसे बाहेर पडलेच नाहीत. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ असलेल्या ब्रम्हपुरीत पूर आला असता त्यांनी तिथे धाव घेतली होती. नागपूरनिवासी पालकमंत्री वडेट्टीवार जेव्हा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतात त्यावेळी पाहणी करताना गुल्हाने सोबत असतात. या व्यतिरिक्त ते कार्यालयात असतात. कोरोनाच्या काळात लोकांना उपचार मिळत नाही आहे, बेडची कमतरता आहे, आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे असे चित्र असताना गुल्हाने यांना बाहेर पडून नेमकी काय स्थिती आहे, त्यात काय कमी आहेत, त्यात तातडीने सुधारणा कशा होतील हे जाणून घेण्याची तसदी घेत नसल्याने गुल्हाने सध्या टीकेचे पात्र ठरले आहे. त्यांच्याविरोधात नागरिक सोशल मीडियावर संताप व्यक्त करीत आहेत.