चंद्रपूर - जे कंत्राटदार विहीत मुदतीत बंधाऱ्याचे काम पुर्ण करीत नाहीत, अशा कंत्राटदारांबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कडक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार लघु पाटबंधारे विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी अशा कंत्राटदाराकडील एकुण 21 बंधाऱ्याचे बांधकामाचे करारनामे मागील दोन महिण्यात रद्द केले. एवढेच नव्हे तर या कंत्राटदारांची सुरक्षा ठेव व अनामत रक्कम शासनखाती जमा करण्यात आली आहे.
ग्रामिण भागातील शेतकरी सिंचनाच्या सोयी पासून वंचित-
जिल्हा परिषद, लघुपाटबंधारे विभाग, चंद्रपूर येथील सिमेंट प्लग बंधारे, बंधारे बांधकाम व दुरुस्तीचे कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात आले होते. बांधकामाचे कंत्राट घेण्याकरीता कंत्राटदार, मजुर सहकारी सेवा संस्था, तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी बांधकामाचे कंत्राट मोठ्या प्रमाणात मिळविले. करारनामा सुद्धा करण्यात आले होते. परंतु बांधकामे विहित मुदतीत सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे शासनाचा निधी खर्च होत नाही व बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण होत नाही. त्यामुळे ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी पासून वंचित राहावे लागत आहे. सोबत शासनाचा शेतकऱ्याप्रती असलेला उद्देश सफल होत नसल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.