चंद्रपूर -जिल्ह्यात अन्य जिल्हा अथवा राज्यातून येणाऱ्या नागरिकांना 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण (क्वारंटाइन) केले जाणे बंधनकारक आहे. मात्र, हा नियम केवळ सामान्य नागरिकांसाठी लागू होतोय. बड्या लोकांसाठी असले नियम फक्त कागदावर असल्याचा प्रकार चंद्रपुरात समोर आला आहे.'आत्मा'शी संबंधित एका अधिकाऱ्याला होम क्वारंटाइन करण्यासाठी, चक्क कृषी विभागाचे ऑफिस देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे त्या अधिकाऱ्याच्या बडदास्तीसाठी एक शिपाईही नेमण्यात आला आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. रेड झोनमध्ये जाणे आणि येण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. येथून विना परवानगी प्रवास करणाऱ्याना क्वारंटाइन करण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासनाने शासकीय, निमशासकीय इमारती ताब्यात घेतल्या आहे. सामान्य माणूस येथे निमूटपणे राहतात. पण, उच्चभ्रू लोकं क्वारंटाइन टाळण्यासाठी विविध क्लूप्त्या करत असल्याचे समोर आले. असाच प्रकार कृषी कार्यालयात दिसून येत आहे.
चंद्रपुरातील 'आत्मा' कार्यालयाचे लेखाधिकारी नागपूरहून परतले. यांची माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेला दिली. तेव्हा त्यांना होम क्वारंटाइन होण्यास सांगितले. विशेष बाब म्हणजे, त्या अधिकाऱ्याला प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या कार्यालयात न पाठवता, त्यांच्यासाठी खास 'आत्मा' कार्यालयचं क्वारंटाइन सेंटर केले.
गंभीर बाब म्हणजे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या कार्यालयावर तसा शिक्काही मारला. या काळात त्या अधिकाऱ्याला भेटण्यास मज्जाव करण्यात आला. तसेच त्या अधिकाऱ्याच्या बडदास्तीसाठी एका शिपायाची नेमणूकही करण्यात आली. कोणत्याही इमारतीला क्वारंटाइन सेंटरची मंजूरी देताना अनेक औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. त्यानंतरच त्याला परवानगी दिली जाते. मात्र 'आत्मा'चे कार्यालय याला अपवाद ठरले. यामुळे सर्व सामान्य जनतेमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, तो अधिकारी रात्री आत्मा कार्यालयात राहत नसल्याची माहिती मिळत आहे. तो नागपूरहून ये-जा करत असल्याचे समजते.