चंद्रपूर - चिमुर तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात हरभरा पिकाचे प्रमाणित बियाणे उपल्ब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. बियाण्याच्या मागणीसाठी शेकडो हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
कृषी विभागाकडून हरभऱ्याचे बियाणे मिळेना; संतप्त शेतकऱ्यांचा चिमूर कृषी कार्यालयात ठिय्या - gajanan butake
खरीप हंगाम संपल्यानंतर आता शेतकरी वर्ग आता रब्बी हंगामातील पेरणीच्या तयारीला लागला आहे. मात्र, तालुका कृषी कार्यालयात बियाणे येऊनही ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
हेही वाचा -चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीत रानडुकरांचा धुमाकूळ
चिमूर तालुक्यात नेरी, मांसळ, खडसंगी, भिसी, शंकरपूर परिसरात रब्बी हंगामात हरभऱ्याचे पीक घेतले जाते. खरीप हंगाम संपल्यानंतर आता शेतकरी वर्ग रब्बी पीक पेरणीच्या तयारीला लागला आहे. शासनाकडून अनुदानित बीयाणे मिळावे, यासाठी शेतकरी तालुका कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. बियाणे येऊनही ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान जमिनीतील ओलावा कमी होत असल्यामुळे प्रशासनाने त्वरीत बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.