महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथक चंद्रपुरात, आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याचे निर्देश

या पथकाने जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या कोरोना विषयक उपाययोजनांची प्रशंसा केली. तसेच आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यासाठी मायक्रोबायोलॉजीस्ट व मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना देतानाच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात वाढविण्यासही सांगितले.

Central health department team took review
Central health department team took review

By

Published : Apr 11, 2021, 7:53 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येने शासनाच्या चिंतेत भर पडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही कोरोनाचा कहर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागाच्या पथकाने भेट देऊन जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा कोरोनाचा आढावा घेतला.

दोन सदस्यीय पथकात एम्स, जोधपूरचे डॉ.निशांत चव्हाण यांच्यासह उपसंचालक, एनसिडीसी, दिल्लीचे डॉ. जयकरण यांचा समावेश आहे.

आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याच्या सूचना-

या पथकाने जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या कोरोना विषयक उपाययोजनांची प्रशंसा केली. तसेच आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यासाठी मायक्रोबायोलॉजीस्ट व मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना देतानाच कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात वाढविण्यासही सांगितले. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू होतो, त्यासाठी शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासणीसाठी पल्स ऑक्सीमिटर वाटपाचे निर्देशही केंद्रीय पथकाने दिलेत. यावेळी केंद्रीय आरोग्य पथकाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील लसीकरण केंद्राची पाहणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेची माहिती त्यांनी जाणून घेतली.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोरोना संसर्गाची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्तकतेने उपाययोजना राबवत असल्याची माहिती दिली. तसेच आरटीपीसीआर चाचण्यांही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पथकास सांगितले. याचबरोबर रुग्णांचे वेळेत निदान होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगत त्यांनी जिल्ह्यात पूरेशा प्रमाणात खाटांची व इतर अत्यावश्यक सुविधांची उपलब्धता ठेवण्यावर प्रामुख्यान भर देण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य पथकाला दिली.

इंडस्ट्रियल कंपन्यांमध्ये कामगारांची तपासणी मोहीम

जिल्ह्यात आढळणारे दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्ण, होणारे मृत्यू, बरे झालेले रुग्ण व टेस्टिंग याबद्दलची माहिती सादर केली. तसेच तालुकानिहाय कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध बेडची माहिती, त्यासोबतच जिल्ह्यात माझे कुंटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेतंर्गत आयएलआय व सारी रुग्णांचे सर्वेक्षण तसेच घरोघरी जाऊन गृहभेटी देणे आरोग्य विभागामार्फत सुरू आहे. जिल्ह्यात उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर असून कामगार वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे इंडस्ट्रियल कंपन्यांमध्ये कामगारांची तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.

आयईसी ऍक्टिव्हिटी अंतर्गत ग्रामस्तरावर सरपंच,नगरसेवक, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून तसेच मेगाफोन, जिंगल्स याद्वारे कोरोना विषयक जनजागृती करण्यासोबतच मास्क न लावणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन, होम आयसोलेशन मधील रुग्ण, जिल्ह्यात झालेले एकूण लसीकरण ही सर्व माहिती केंद्रीय पथकासमोर सादर केली.

या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमने, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, मनपा,वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details