चंद्रपूर: सहा जण नागपूरहून नागभीडकडे कारमधून जात असताना त्यांचे वाहन विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका प्रवासी बसला धडकले. टक्कर इतकी भीषण होती की, कारमधील चार जण जागीच मरण पावले. त्यांचे मृतदेह कापून बाहेर काढावे लागले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू:अपघातात एक मुलगी व महिला गंभीर जखमी झाली. त्यांना नागभीड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यापैकी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मुलीला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
वर्ध्यात बसचा विचित्र अपघात: नागपूर येथून वर्ध्याकडे जाणाऱ्या तीन बस एकमेकांना मागून धडकल्या. टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटी बसच्या मागे प्रवाशी घेण्यासाठी थांबलेल्या बसला मागून येणाऱ्या बसने जबर धडक दिली. यात धडक देणाऱ्या मागच्या बसचा चालक गंभीर जखमी झाला, तर वाहकासह पंधरा प्रवाशी जखमी झाले. हा अपघात नागपूर वर्धा महामार्गावर महाबळा नजीक जंगलापूर शिवारात झाला. अपघात झाला तेव्हा एकच खळबळ उडाली. प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पाहायला मिळाले.
बसला मागून जबर धडक: पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत परिस्थिती नियंत्रणात आणली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर येथून पुसदकडे जाणारी उमरेड आगाराची एसटी बस क्रमांक एमएच 40 वाय 5585 ही पंक्चर झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या कडेला थांबून चालक टायर बदलवीत होता. तिच्या मागेच नागपूरकडून दिग्रसला जात असलेली बस क्रमांक एमएच 06 एस 8090 ही बस प्रवाशी घेण्यासाठी रोडच्या मधोमध थांबली. त्या दरम्यान नागपूरकडून देगलूरला जाणारी एसटी बस क्रमांक एमएच 20 बीएल 4104 ही भरधाव आली. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात प्रवासी घेत असलेल्या बसला मागून जबर धडक दिली.
हेही वाचा:
- Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी; मृतांचा अधिकृत आकडा 275 वर
- Odisha Train Accident : तीन नाही तर एकाच ट्रेनचा झाला अपघात; रेल्वे बोर्डाची महत्वाची माहिती
- Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघात; मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू, भुवनेश्वरमधील एम्समध्ये ठेवण्यात येणार 100 मृतदेह